आगीमुळे उद्‌ध्वस्त झालेल्या मजूर कुटुंबाला जिल्हा परिषद शिक्षक, अधिकाऱ्यांचा मदतीचा हात

विजय पगारे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

इगतपुरी - विद्यार्थ्यांना निव्वळ मानवतेचे पुस्तकी धडे न शिकवता, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींसह शासकीय अधिकाऱ्यांनी कृतीतून आदर्श घालून दिला. अत्यंत गरीब मागासवर्गीय मजूर कुटुंबाचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अंगावरच्या कपड्यांवर डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या त्या कुटुंबाला जगण्याची मोठी उभारी त्यांच्या या मदतकार्याने मिळाली.

इगतपुरी - विद्यार्थ्यांना निव्वळ मानवतेचे पुस्तकी धडे न शिकवता, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींसह शासकीय अधिकाऱ्यांनी कृतीतून आदर्श घालून दिला. अत्यंत गरीब मागासवर्गीय मजूर कुटुंबाचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अंगावरच्या कपड्यांवर डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या त्या कुटुंबाला जगण्याची मोठी उभारी त्यांच्या या मदतकार्याने मिळाली.

शहराच्या फुलेनगर भागातील अनिल उन्हवणे यांच्या सोनाली व मोनाली या मुली जिल्हा परिषदेच्या तीन लकडी शाळेत शिकतात. मात्र, सलग तीन दिवस या दोघीही शाळेत न आल्याने शाळेचे शिक्षक उमेश बैरागी यांनी इतर विद्यार्थ्यांकडे चौकशी केली. त्यातून उन्हवणे यांच्या घरात शनिवारी गॅस सिलिंडर स्फोटाने पूर्ण कुटुंब रस्त्यावर आल्याचे कळले. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच उमेश बैरागी यांनी मुख्याध्यापक वासुदेव वराडे, शिक्षिका हेमलता चव्हाण, सविता गोसावी, शकुंतला डोळस, सुनंदा भोर यांच्यासह उन्हवणे कुटुंबाला गाठले. पाच जणांच्या कुटुंबाच्या सर्व जीवनोपयोगी वस्तूंची होळी तर झालीच. शिवाय सोनाली, मोनालीच्या शाळेचे साहित्यही खाक झाले. उमेश बैरागी यांनी तातडीने गटविकास अधिकारी किरण जाधव, गटशिक्षणाधिकारी शिवाजी अहिरे यांना मदतीसाठी साद घातली. सर्वांनी तत्काळ रोख रक्कम, किराणासह शैक्षणिक साहित्य उन्हवणे कुटुंबाला दिले. या शिक्षकांनी याबाबत सोशल मीडियावर आवाहन करताच मदत उभी राहिली.

सहाय्यक गटविकास अधिकारी वेंदे, विस्तार अधिकारी अशोक मुंडे, विजया फलके, केंद्रप्रमुख विलास बत्तीसे, राजेंद्र नांदूरकर, अनिल बागूल, भिला अहिरे, आरती बोराडे, खगेश जाधव, दीपक भदाणे, संजीव निकम, श्रीमती सय्यद, मनीषा वाणी, नाना बागूल, तानाजी कोरडे, द. ल. वाणी, जनार्दन कडवे, अनिस शेख, विजय पगारे, सिद्धार्थ सपकाळे, सागर जळगावकर, राजेंद्र मोरकर, रवींद्र चव्हाण आदींनी बाधित कुटुंबाला मदत देत जगण्याची ऊर्मी दिली. 

विद्यार्थ्यांनीही दिले खाऊचे पैसे
विशेष म्हणजे उन्हवणे कुटुंबासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे, कपडे व भांडी आदी मदत देऊन सामाजिक दातृत्वाचा आविष्कार उभा केला. यामुळे उन्हवणे कुटुंबाला अश्रू अनावर झाले. रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळे नाते निभावत संकटसमयी मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी साश्रुनयनांनी आभार मानले.

Web Title: igatpuri nashik news famile help by zp teacher & officer