सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी ओळखपत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

इगतपुरी - सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवृत्त होत असतानाच विहित नमुन्यातील सरकारी ओळखपत्र देण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या ओळखपत्राचा अंतिम नमुना तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यापुढे सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची ओळख पटविण्यासाठी या ओळखपत्राचा कायमस्वरूपी उपयोग होणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या एका आदेशात म्हटले आहे.

बॅंका, सरकारी कार्यालये, रेल्वे, विमानतळ अशा ठिकाणी ओळख दाखविण्यासाठी सेवानिवृत्तांना राजपत्रित अधिकाऱ्याचे शिफारसपत्र किंवा नेत्या, मंत्र्यांशी संपर्क करून आपले काम करून घ्यावे लागत होते. आता सरकारी निवृत्तांना विहित नमुन्यातील ओळखपत्र मिळणार आहे. महिन्यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाने शासनाच्या प्रत्येक विभागाला सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे ओळखपत्र देण्याच्या सूचना केल्या होत्या. पण या ओळखपत्राचा नमुना कसा असावा, या विषयी मागील महिन्यापासून शासनस्तरावर खल सुरू होता. हा प्रश्न आता मिटला आहे. यापुढे सर्व सरकारी कार्यालये, विभागांनी आपल्या विभागातून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवृत्त होतानाच विहित नमुन्यातील निवृत्तीचे ओळखपत्र द्यावे. हे ओळखपत्र देण्यापूर्वी त्या ओळखपत्राच्या पाठीमागील बाजूस महाराष्ट्र शासनाचा गोल शिक्‍क्‍याची मोहोर उमटावी, असे सामान्य प्रशासन विभागाचे कार्यासन अधिकारी राजेश गायकवाड यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

असे असेल ओळखपत्र
सरकारी सेवेत असताना कर्मचाऱ्यांजवळ जसे ओळखपत्र असते. त्याच आकाराचे हे ओळखपत्र असेल. या ओळखपत्रावर उजव्या बाजूला राजमुद्रा. महाराष्ट्र शासन सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे ओळखपत्र असे ठळक अक्षरात लिहिलेले असेल. ज्या सरकारी विभाग, कार्यालयातून सेवानिवृत्त झाला आहे. त्या विभागाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक नमूद केला असेल. निवृत्तीवेळी धारण केलेले पद, निवृत्तीचा दिनांक, आधारक्रमांक, ओळखपत्र क्रमांक व ओळखपत्र धारकाची स्वाक्षरी, रक्तगट, विशेष आजार, निवास पत्ता, भ्रमणध्वनी अशी समग्र माहिती या ओळखपत्रावर असणार आहे.

Web Title: igatpuri nashik news Permanent Identity Card for retired government employees