अतिरिक्त गुणांसाठी शिक्‍क्‍याची अट रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

इगतपुरी - चित्रकलेसाठीचे अतिरिक्त गुण मिळवण्याकरिता अर्जावर कला संचालकांचाच शिक्का आणि स्वाक्षरी आणणे बंधनकारक करण्याची अट शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. मात्र, शाळेत अर्ज जमा करण्याची मुदत उलटून गेल्यानंतर हा नियम आल्यामुळे यंदा नाही तरी पुढील वर्षांसाठीची विद्यार्थ्यांची धावपळ वाचली आहे.

इगतपुरी - चित्रकलेसाठीचे अतिरिक्त गुण मिळवण्याकरिता अर्जावर कला संचालकांचाच शिक्का आणि स्वाक्षरी आणणे बंधनकारक करण्याची अट शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. मात्र, शाळेत अर्ज जमा करण्याची मुदत उलटून गेल्यानंतर हा नियम आल्यामुळे यंदा नाही तरी पुढील वर्षांसाठीची विद्यार्थ्यांची धावपळ वाचली आहे.

त्याचबरोबर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट ही पुढील वर्षीपासून लागू करण्यात येणार आहे.

कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय गेल्या वर्षीपासून राज्य मंडळाने लागू केला आहे.

यंदा गुणांचा फुगवटा कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने निकष बदलून ते अधिक कडक केले आहेत. नव्या नियमांनुसार चित्रकलेच्या परीक्षांमधील प्रावीण्यासाठी अतिरिक्त गुण हवे असल्यास कला संचालकांचीच स्वाक्षरी आणि शिक्का आणण्याची अट विभागाने घातली होती. मात्र, राज्यभरातील विद्यार्थ्यांनी कला संचालकांची स्वाक्षरी मिळवण्यासाठी रांग लावावी लागते. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कला संचालनालयाकडूनच देण्यात येते. त्यावर आवश्‍यक सर्व तपशील असतात. असे असताना स्वतंत्र प्रमाणपत्राची गरज काय, असे प्रश्न उपस्थित करीत या अटीवर पालक, शिक्षकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. या अटीमुळे अनेक विद्यार्थी अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी पात्र असतानाही त्यांना या गुणांपासून वंचित राहावे लागण्याची शक्‍यता होती. त्या पार्श्वभूमीवर कला संचालकांच्या स्वाक्षरी आणि शिक्‍क्‍याची अट शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. या पुढे चित्रकलेसाठीच्या अतिरिक्त गुणांसाठी मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुखांची स्वाक्षरी आणि शिक्का चालणार आहे.

शिक्षकवर्ग गोंधळात
शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण मिळण्यासाठीचे अर्ज 15 डिसेंबपर्यंत शाळेकडे जमा करायचे होते. मात्र, कला संचालकांच्या शिक्‍क्‍याची अट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज जमा करता आले नाहीत. आता बदललेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारायचे की नाहीत, असा गोंधळ मुख्याध्यापकांचा झाला आहे.

Web Title: igatpuri nashik news Stamp deterence for excess points canceled