शिक्षकांच्या बदल्या यंदा होणारच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

इगतपुरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी राबविण्यात येणारी जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया गेल्या वर्षी सुगम आणि दुर्गम भागातील शिक्षकांच्या वादात रखडली आणि शेवटी रद्द करावी लागली. यंदा ग्रामविकास प्रशासनाने या बदली प्रक्रियेसाठी कंबर कसली असून, प्रक्रियेस आतापासूनच प्रारंभ केला. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी दिली असल्याची माहिती शिक्षकनेते सुनील गाडगे यांनी दिली.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरवात झालेली असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनमध्ये शाळा कोणत्या क्षेत्रात (अवघड, सोपे, पेसा, आदिवासी, महिलांसाठी गैरसोयीचे) याबाबत मॅपिंग करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार मागील वर्षी सुगम भागात असणाऱ्या कोणत्याही शाळेला इतर क्षेत्रात "मॅप' करता येणारी नाही. या वर्षापासून "पेसा'अंतर्गत येणाऱ्या शाळांचेही मॅपिंग होणार आहे. तसेच महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा करण्यासाठी गैरसोयीच्या शाळांदेखील घोषित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मागील वर्षी ज्या शाळा दुर्गम भागात घोषित केलेल्या आहेत त्या शाळांच्या क्षेत्रात मात्र बदल करण्याची सुविधा (अवघडमधून सोपे क्षेत्रात) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सध्या काही तांत्रिक कारणास्तव "स्टाफ पोर्टल" तात्पुरते बंद ठेवण्यात आलेले असून, ते लवकरच सुरू करण्यात येईल. याबाबत शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनील गाडगे आदींच्या नेतृत्वाखाली असीम गुप्ता यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात चर्चा केली.

Web Title: igatpuri nashik news teacher transfer