इगतपुरी - धामणगाव (ता. इगतपुरी) शिवारात शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकले. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यावर दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला त्याच्याच शेतातील पिंजऱ्यात हे बिबटे अडकले.
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील घोटी-सिन्नर महामार्गावरील धामणगाव शिवारात पाटीचा मळा परिसरातील केरू अप्पा गाढवे शेतात काम करत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले होते. तालुका वन अधिकारी रमेश ढोमसे, परिमंडल अधिकारी गोरक्ष जाधव, रेश्मा पाठक, एफ. ए. सय्यद, संतोष बोडके यांनी काल सकाळी पिंजरा लावला होता आणि आज सकाळी दोन बिबटे या पिंजऱ्यात अडकले. इगतपुरी तालुक्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाल्याने बिबट्यांच्या लपण्याच्या जागा आता धोक्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी कुऱ्हेगाव शिवारात नागरिकांना तीन बिबटे संचार करताना आढळले होते. इगतपुरी तालुक्यात पूर्व भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
|