नांदगाव : होर्डिंग, फलक काढून टाकण्याची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

रस्त्यांनी मोकळे श्वास घेतले जागोजागी लावण्यात आलेल्या होर्डिंग मुळे शहराचे विद्रुपीकरण थांबविण्याबाबतचे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन यानिमित्ताने झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी दिली. या होर्डिंग हटाव मोहिमेमुळे शहरातील एकमेव उद्यान मोकळे झाले. त्यामुळे अनेक वृक्षराजीने नटलेल्या व शहरातील एकमेव सौंदर्यस्थळं आता नजरेस पडले

नांदगाव : शहरात पालिकेच्या विना परवानगीने लावण्यात आलेले होर्डिंग व फलक काढून टाकण्याची मोहीम आज पालिकेच्या मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी राबविली. मुख्याधिकाऱ्यांच्या या मोहिमेमुळे होर्डींगच्या मागे कोंडले गेलेल्या जागा मोकळ्या झाल्याने दिसू लागल्या आहेत.

रस्त्यांनी मोकळे श्वास घेतले जागोजागी लावण्यात आलेल्या होर्डिंग मुळे शहराचे विद्रुपीकरण थांबविण्याबाबतचे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन यानिमित्ताने झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी दिली. या होर्डिंग हटाव मोहिमेमुळे शहरातील एकमेव उद्यान मोकळे झाले. त्यामुळे अनेक वृक्षराजीने नटलेल्या व शहरातील एकमेव सौंदर्यस्थळं आता नजरेस पडले मुख्याधिकाऱ्यांच्या या कृतीचे जेष्ठ नागरिकांनी स्वागत केले, तर भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप व तालुकाध्यक्ष निलेश पगारे यांनी नाराजी व्यक्त केली. ३० ऑगस्ट ते पाच सप्टेंबर सुरु होत असलेल्या श्री संत भगवानबाबा जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने लावण्यात आलेले बॅनर्स, होर्डिंग या मोहिमेत काढण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रार त्यांनी केली आहे.

दरम्यान शहरात ठिकठिकाणी जागा अडवून उभे असलेले १२ मोठ्ठे फ्लेक्स होर्डींग्ज व ३५ ठिकाणचे रस्त्यात लावलेले फ्लेक्स फलक निघाल्याने शहरातील प्रमुख ठिकाणांचे सौंदर्य ठळक दिसू लागले आहे. सर्वांच्या विरंगुळ्याचे एकमेव साधन असलेली शनी मंदिर बाग मोठ्या होर्डींगनी पूर्ण झाकून गेली होती. मोहिमेत काढण्यात आलेले होर्डींग २० x २० च्या आकाराचे होते.तर फ्लेक्स फलक ५ x १० च्या आकाराचे होते. बागेशिवाय, हुतात्मा चौक, आंबेडकर चौक, रेल्वे गेट, गांधी चौक, महात्मा फुले चौक याशिवाय अनेक जागांवर मोठे होर्डींग्ज अनधिकृतपणे पण बिनदिक्कत उभे होते. राष्ट्रपुरुषांचे पुतळे या होर्डींगमागे जणू गायब झाले होते. फलक गायब झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे. मुख्याधिकारी श्रिया देवचके यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अशा होर्डींगवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेशच आहेत. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय व वैयक्तिक कारणांसाठी होर्डींग लावून शहराचे विद्रूपिकरण करता येणार नाही. या मोहिमेत घुगे यांच्यासह १० कर्मचाऱ्यानी भाग घेऊन हि मोहीम फत्ते केली अशी माहिती देवचके यांनी दिली. जवळ जवळ सर्वच फलक विना परवाना होते असे ही त्यांनी सांगितले.

Web Title: illegal hoarding remove in Nandgaon