
Dhule News : बेकायदेशीर नळधारकांना पाचपट पाणीपट्टीचा भुर्दंड
Dhule News : मुख्य वितरण वाहिनीवरील बेकायदेशीर नळ कनेक्शन्समुळे जलकुंभ भरण्यास अडचणी निर्माण होतात, परिणामी पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. (Illegal tap owners to be charged five times water tax dhule news)
त्यामुळे अशा बेकायदेशीर नळधारकांना पाच पट पाणीपट्टी आकारावी, बेकायदेशीर नळ कनेक्शन्समुळे हनुमान टेकडी ते रामनगर जलकुंभादरम्यानची लाइन बंद करून तापी योजनेवरून हा जलकुंभ भरावा यासह सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी विविध सूचना महापौर प्रतिभा चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही श्रीमती चौधरी यांनी दिला.
धुळे शहरातील विविध भागात ८ ते १० दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीमती चौधरी यांनी महापालिकेतील आपल्या दालनात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली.
उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, नगरसेविका कल्याणी अंपळकर, नगरसेवक हिरामण गवळी, अमोल मासुळे, दगडू बागूल, भारती माळी, वंदना भामरे, सुनील बैसाणे, अभियंता कैलास शिंदे, सहाय्यक अभियंता एन. के. बागूल, चंद्रकांत उगले, प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाणी पुरवठ्याची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासनामार्फत प्रतिनियुक्तीवर दोन उप-अभियंता मागणीसाठी संबंधित मंत्र्यांना समक्ष भेटून पत्र सादर करण्याचे बैठकीत ठरले. दरम्यान, मुख्य वितरण वाहिनीवर बेकायदेशीर नळ कनेक्शन्समुळेही पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा बैठकीत समोर आला.
विशेषतः हनुमान टेकडी ते बडगुजर जलकुंभादरम्यान असलेल्या बेकायदेशीर नळधारकांना पाच पट पाणीपट्टी आकारण्यात यावी तसेच अनधिकृत कनेक्शनधारकांनाही पाच पट पाणीपट्टी लावावी असे आदेश महापौर श्रीमती चौधरी यांनी दिले.
सुकवद, बाभळे तसेच, इतर सर्व पाणी पुरवठा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, फ्लो-मीटर्स चालू करून घेणे, वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठाप्रश्नी वीज कंपनीला एक्स्प्रेस फीडरबाबत नोटीस देणे, कंझ्युमर फोरममध्ये तक्रार करणे, २१ मेपर्यंत प्रत्येक जलकुंभावरील वितरण वाहिन्यांचे नकाशे बनवून सादर करणे, झोन तयार करणे, तापी योजनेवरील नवीन तीन पंप कार्यान्वित करणे याबाबत महापौर श्रीमती चौधरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
अन्यथा दंडात्मक कारवाई
सदर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आली. आठ दिवसानंतर पुन्हा बैठक घेऊ व कामात कामात हलगर्जी, दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रतिदिन दंडात्मक कारवाई करण्याचा आदेशही महापौर श्रीमती चौधरी यांनी दिला.
कार्यवाहीच्या अनुषंगाने उपायुक्तांनी रोज पाचला आढावा घ्यावा व तसा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. कनिष्ठ अभियंता हेमंत पावटे, कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते.
शनिवारी दुरुस्तीची कामे
दरम्यान, शनिवारी (ता.२०) वीज कंपनीकडून शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी तापी योजनेवरील सर्व लिकेजेस दुरुस्त करण्यात येणार आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी शहर अभियंता यांच्यामार्फत संपूर्ण शहरातील लिकेजेसची तपासणी करण्यात येऊन त्याबाबतही नियोजन करण्याबाबत बैठकीत ठरले.