अस्थायी अधिकाऱ्यांचे लवकरच समावेशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

भडगाव - 'सकाळ'ने राज्यातील 738 अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्त मालिकेला यश आले आहे. शासनाने यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तर राज्याच्या आरोग्य विभागाने गट "ब' पदाबाबत तातडीने माहिती देण्यासंदर्भात आरोग्य उपसंचालकाना पत्र दिले आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाची एक तपापासूनची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच "बीएएमएस' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

एक तपापासून समावेशनाबाबत राज्यातील 738 वैद्यकीय अधिकारी शासन दरबारी खेटा मारत होते. मात्र, प्रत्येकवेळी राज्यकर्त्यांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या. 29 ऑगस्ट 2017 ला राज्यातील 738 अस्थायी "बीएएमएस' वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट "ब' पदावर समावेशनाबाबत राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. मात्र, गट "ब' वैद्यकीय अधिकारी हे पद लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येत असल्याने आरोग्य विभागाने ही पदे वगळण्याबाबत लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवला. त्यांनी या प्रस्तावात तीन वेळा त्रुटी काढल्या. त्या त्रुटी आरोग्य विभागाने पूर्ण केल्या. मात्र, 19 जुलै 2018 ला लोकसेवा आयोगाने समांतर आरक्षणास यामुळे बाधा निर्माण होईल, असे कारण देत अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समायोजनाच्या प्रस्तावास नकार दिला. त्यामुळे मंत्रिमंडळाने समायोजनाबाबत निर्णय होऊन ही राज्यातील दुर्गम भागात सेवा देणारे 738 वैद्यकीय अधिकाऱ्यांना समायोजनाची प्रतीक्षा होती.

विभागनिहाय अस्थायी वैद्यकीय अधिकारी
विभाग              अधिकारी

नाशिक ................ 229
पुणे ..................... 51
कोल्हापूर .............. 38
ठाणे ................... 63
औरंगाबाद ............ 11
लातूर .................. 11
अकोला ............... 194
नागपूर ................. 141

Web Title: Immediate Inclusion of Temporary Officers Sakal Impact