Dhule News : धुळे शहरातील 88 हजार मालमत्तांना सुधारित कर! हरकतींसाठी 21 दिवस | Improve 88 thousand properties in Dhule city 21 days for objections Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : धुळे शहरातील 88 हजार मालमत्तांना सुधारित कर! हरकतींसाठी 21 दिवस

Dhule News : येथील महापालिका हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांना सुधारित कर आकारणी झाल्यानंतर आता महापालिकेकडून धुळे शहरातील मालमत्तांनाही सुधारित कर आकारणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

यात मालमत्ताधारकांना करयोग्य मूल्य निश्‍चितीबाबतच्या नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत शहरातील तब्बल ८८ हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

प्रारंभी शहराच्या देवपूर भागात ही प्रक्रिया सुरू आहे. या नोटिसांवर हरकती-सूचना मागविणे, त्यावर सुनावणीअंती कर आकारणी कायम होईल. (Improve 88 thousand properties in Dhule city 21 days for objections Dhule News)

धुळे महापालिका हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण (मोजमाप) करण्यात आले. त्यानंतर प्रारंभी हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया झाली.

त्यानुसार हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीची बिले वाटप झाली. त्यानुसार कर वसुलीही सुरू झाली आहे. दरम्यान, आता उर्वरित शहरातील मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत.

८८ हजार मालमत्ता

हद्दवाढक्षेत्र वगळता उर्वरित शहरात यापूर्वी ७२ हजार मालमत्ता होत्या. नव्याने सर्वेक्षण झाल्यानंतर या मालमत्तांची संख्या ८८ हजार झाली आहे. या सर्व मालमत्ताधारकांना सुधारित करयोग्य मूल्य निश्‍चितीच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

प्रारंभी शहराच्या देवपूर भागातील ३१ हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोटिसा बजावणे, हरकती-सूचना मागविणे, सुनावणी घेणे यासाठी देवपूर, साक्री रोड, पेठ भाग व चाळीसगाव रोड असे चार भाग करण्यात आले आहेत.

हरकतींसाठी २१ दिवस

आपल्या मालमत्तेची जागेवर मोजणी व तपासणी करून कर आकारणी प्रस्तावित केली आहे. याबाबत आपले इमारतीचे किंवा जागेचे करयोग्य मूल्यास अथवा कर आकारणीमध्ये तसेच नावात काही चूक असल्यास त्याबाबतची हरकत/तक्रार असल्यास कारणे व लेखी पुराव्यासह लेखी स्वरूपात महापालिका आयुक्त यांच्याकडे यादी प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत करावी.

तक्रारीबाबत लेखी अर्ज प्राप्त न झाल्यास सुधारित कर आकारणी आपल्याला मंजूर आहे असे समजण्यात येऊन कर आकारणी कायम करण्यात येईल, असे नोटिशीत नमूद केले आहे.

‘हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रिव्हिजन’अभावी तफावत

शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीबाबत १९९२ नंतर रिव्हिजनच झालेले नाही. दरम्यान, २०१५-१६ मध्ये करवाढ झाल्यानंतर त्यानंतर शहरात ज्या मालमत्ता उभ्या राहिल्या, त्यांना या सुधारित करानुसार आकारणी झाली.

त्यापूर्वीच्या मालमत्तांना मात्र जुनाच कर लागू होता. त्यामुळे या जुन्या मालमत्ताधारकांना आता नवीन कर आकारणीच्या नोटिसा गेल्यानंतर करामध्ये मोठी तफावत दिसत आहे. परिणामी नवीन बिल पाहून या जुन्या मालमत्ताधारकांचे डोळे विस्फारत असल्याचे चित्र आहे.

मात्र, कर आकारणी बरोबर असल्याचे मनपा मालमत्ता कर विभागाचे अधिकारी म्हणतात. अर्थात मालमत्तांच्या मोजमापात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून कर आकारणी होऊ शकणार आहे. दरम्यान, जुन्या मालमत्तांना अपेक्षित वार्षिक भाडेमूल्यावर १० टक्के घसाराही देण्यात येत असल्याने तेवढी रक्कम वजा होत आहे.

एकत्रित मालमत्ता कर ३६ टक्के, विशेष शिक्षण कर १ टक्का, वृक्षसंवर्धन कर १ टक्का, अग्निशमन कर १ टक्का, जललाभ कर ०.५ टक्का, दिवाबत्ती कर ०.५ टक्का, मलनिस्सारण कर ०.५ टक्का, मलप्रवाह सुविधा कर ५०० रुपये, विशेष स्वच्छता कर ५० रुपये, मोठी इमारत कर १० टक्के, शिक्षण कर (शासन नियमाप्रमाणे).