सटाण्यात तीन दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

रोशन खैरनार
सोमवार, 18 जून 2018

जीवनशैलीत अतिप्राचीन काळापासून असलेल्या योगासनांचा अवलंब करावा व शारीरिक, मानसिक विकास साधावा असे आवाहन बागलाणचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी आज सोमवार (ता. १८) ला येथे केले. 

सटाणा - नियमित योगासनांमुळे शरीर व मन निरोगी, ताजेतवाने व तंदुरुस्त राहते. अनेक दुर्धर आजारांपासून मुक्तीही मिळते. प्रत्येक व्यक्तीने योग दिनाच्या माध्यमातून आपल्या दगदगीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत अतिप्राचीन काळापासून असलेल्या योगासनांचा अवलंब करावा व शारीरिक, मानसिक विकास साधावा असे आवाहन बागलाणचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी आज सोमवार (ता. १८) ला येथे केले. 

बागलाण पंचायत समिती, शिक्षण विभाग व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील मविप्र संचालित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या मैदानावर तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक प्रतिनिधींच्या तीन दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे निवृत्त कर्मचारी एन. एम. गांगुर्डे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. बच्छाव बोलत होते. पतंजलीच्या महिला तालुकाप्रमुख व नगरसेविका डॉ. विद्या सोनवणे, भारत स्वाभिमानी संघटनेचे तालुकाप्रमुख नंदकिशोर शेवाळे, सुनिता ईसई प्रमुख पाहुणे होते. बुधवार (ता. २०) पर्यंत सुरु असलेल्या या शिबिरात सर्व प्रशिक्षणार्थींना योगासनांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर गुरुवार (ता. २१) रोजी जागतिक योग दिनानिमित्त प्रशिक्षणार्थी शिक्षक आपापल्या शाळांवर विद्यार्थी व ग्रामस्थांना योगासनांचे धडे देणार असल्याचेही श्री. बच्छाव यांनी स्पष्ट केले. शिबिरात तालुक्यातील ४५० शाळांमधील पुरुष - महिला शिक्षक प्रतिनिधींसह नागरिकही सहभागी झाले आहेत. आज पहाटे साडेपाचला सुरु झालेल्या या शिबिरात पतंजली योग समितीच्या तालुकाध्यक्षा दो. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी ताडासन, वृक्षासन, पादह्स्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, अर्ध उट्रासन, शशकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, अनुलोम - विलोम, भ्रामरी रेचक आदी योगासन प्रकारांचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन घेतले. शिबिरात पालिकेचे गटनेते महेश देवरे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तुषार महाजन, विनायक बच्छाव, एस. डी. शिंदे, डी. जे. गायकवाड, दिलीप मेतकर आदींसह शिक्षक व नागरिक सहभागी होते. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: Inauguration of three day yoga training camp in satana