त्र्यंबकेश्‍वरच्या पुरोहितांची 'प्राप्तिकर'कडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नाशिक - नारायण नागबली, त्रिपिंडी अशा धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथील पुरोहितांची मिळकत ही सामान्यांच्या चर्चेचा विषय आहे. परंतु, आता नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर येथील पुरोहितांवर प्राप्तिकर विभागाचीही नजर गेली आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील तीन पुरोहितांची मागील दोन दिवसांपासून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यातील दोन जणांचा पौरोहित्याखेरीज बांधकाम साहित्य विक्रीचाही व्यवसाय आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथे पूजेसाठी देशभरातून अनेक जण येत असतात. त्यामध्ये उद्योगपती, वरिष्ठ सरकारी अधिकारी, न्याय, प्राप्तिकर खात्यातील उच्चपदस्थांचाही समावेश असतो. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरमधील पुरोहितांना प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे येणे जाणे नवीन नाही. परंतु, दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वरमध्ये ठाण मांडून बसलेल्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे आगमन हे पूजेसाठी नाही, तर उत्पन्न तपासणीसाठी झाल्याने सर्वांचेच चेहरे चिंताक्रांत झाले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन पुरोहितांकडेच चौकशी सुरू केली असली, तरी त्यांच्याकडे 52 जणांची यादी असल्याचे बोलले जाते. यामुळे ही तपासणी पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचीही चर्चा आहे.

पौरोहित्यातून येत असलेल्या उत्पन्नातून अनेकांनी इतर व्यवसायही सुरू केले आहेत. त्यातील बांधकाम साहित्यविक्रीशी संबंधित पुरोहितांवरच छापे पडले आहेत. यामुळे या पुरोहितांनी साहित्य खरेदी केलेल्या व्यावसायिकांकडील कागदपत्रांमध्ये यांची नावे आढळल्यानेच येथील पुरोहितांवर छापे पडल्याचे बोलले जाते.

Web Title: income tax inquiry to trambakeshwar purohit