भारतीय द्राक्षांच्या भावात युरोपमध्ये घसरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

चिलीमधून निर्यात सुरू झाल्याने भाव चाळीसच्या घरात

चिलीमधून निर्यात सुरू झाल्याने भाव चाळीसच्या घरात
नाशिक - चिलीमधील द्राक्षे युरोपात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने भारतीय द्राक्षांच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या वर्षी युरोपमध्ये एका किलोला 45 ते 50 आणि इंग्लंडमध्ये 60 ते 65 रुपये असा भाव मिळाला होता. यंदा चिलीतून आलेल्या द्राक्षांमुळे भारतीय द्राक्षांना युरोपमध्ये 40, तर इंग्लंडमध्ये 50 रुपये भाव मिळतो आहे. चिलीची द्राक्षे संपल्यानंतर निर्यातवृद्धीची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

द्राक्षांचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातून मागील वर्षी युरोपमध्ये 76 हजार 425, तर युरोपव्यतिरिक्त अन्य देशांत 24 हजार 425 टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा युरोपात आतापर्यंत 72 हजार 445 आणि युरोपव्यतिरिक्त देशांत 24 हजार 492 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यंदा कॅनडात 17, रशियात 900, चीनमध्ये 25 कंटेनर द्राक्षे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय बांगलादेशात 40 ते 55 रुपये किलो भावाने द्राक्षे पाठविण्यात येत आहेत.

निर्यातीत भाव कमी मिळत असल्याने काढलेली द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत; परंतु देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना फारशी मागणी नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या भावात किलोमागे 5 ते 10 रुपयांनी घसरण झाली आहे.

उत्पादनावर थंडीचा परिणाम
यंदा चांगला पाऊस झाला; मात्र थंडी लवकर सुरू होऊन उशिरापर्यंत रेंगाळल्याने मण्यांचे आकार छोटे राहून कमी साखर उतरण्यास विलंब झाला. त्यामुळे बागा 15 दिवस उशिरा काढाव्या लागल्या. द्राक्षांच्या उत्पादनातही एकरी दीड ते दोन टनाने घट झाली.

Web Title: indian grapes rate decrease in europe