उपचार अभावी पाच दिवसांच्या बाळाचा मृत्यू

hospital.jpg
hospital.jpg

सटाणा : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍याच्या हलगर्जीपणामुळे वनोली (ता. बागलाण) येथील पाच दिवसांच्या बाळासला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने बाळ दगावल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या गंभीर घटनेनंतर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने बाळाच्या मृत्यूची दप्तरी नोंद सुद्धा केली नाही. याने आरोग्य यंत्रणेविषयी तालुक्यात संशय निर्माण होऊन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वनोली येथील मंदा पिंपळसे या महिलेची गेल्या (ता.२६) जुलैला प्रसुती झाल्यानंतर तिने मुलाला जन्म दिला होता. साजन सोनवणे (५ दिवस) हे नवजात बालक स्तनपान करत नसल्याने कुटुंबीयांनी (ता.३०) जुलैला सकाळी ९ वाजता ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी धाव घेतली. मात्र दोन ते तीन तास थांबूनही आरोग्य केंद्रात नेमणूक असलेले वैद्यकीय अधिकारी न आल्याने, परिचारिकेने स्वतःच्या हस्ताक्षराने रुग्णाचे संदर्भसेवा पत्र भरून पालकांच्या हातात दिले.

शासनाच्या नियमानुसार ताहाराबाद येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने बाळावर तात्काळ उपचार करणे आवश्यक होते. मात्र वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात आलेच नसल्याने बाळाला पुढील उपचारांकरीता सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासनाच्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मोफत सेवा देणे नियमाने बंधनकारक होते. परंतु, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारामुळे मंदा पिंपळसे आणि त्यांच्या बाळाला रुग्णालयाकडून कोणतीही सेवा मिळाली नाही. त्यांना भर पावसात दुचाकीवरून सटाणा येथे जावे लागल्याची गंभीर बाबही समोर आली आहे.

दरम्यान, भर पावसात मातेसह बाळाला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. येथेही ती माता आणि तिच्या बाळाला हाल अपेष्ठाच सहन कराव्या लागल्या. बाळाला रुग्णालयात नेमणुकीवर असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना दाखविले असता त्यांनी तपासणी न करता बाळाच्या पोटाला हात लावला आणि एक औषध लिहून देऊन घरी पाठविले. घरी नेल्यानंतर बाळाची प्रकृती अधिकच बिघडली.

उपचारासाठी नातेवाईकांनी पुन्हा भर पावसात वनोलीहून बाळाला दुचाकीवर ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. उपचाराअभावी बाळ दगावल्याने संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकार्‍याने योग्य उपचार न केल्यामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍याने गरीब आदिवासींना बळाचा वापर करून रुग्णालयाबाहेर काढले.


- येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या सतरा वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक लाभलेला नाही. त्या पदाला पात्र नसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार दिला जातो. सक्षम अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातून उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. या गंभीर प्रकाराबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याबाबत अधिक माहितीसाठी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता डॉ.बांगर आठवड्यातून फक्त दोन दिवस येत असल्याची गंभीर प्रकार समोर आला. 

- तालुका सक्षम वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करणे बंधनकारक आहे. मात्र बागलाणच्या या जबाबदार पदावर कळवण तालुक्याच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करून जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरु केला असल्याचे बोलले जात आहे. सक्षम अधिकारी नसल्यामुळे बहुतांश आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी चार-चार दिवस गैरहजर असतात. त्यामुळे उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या दोन आदिवासी महिलांचा मृत्यू झाला आहे. 

- "सटाणा ग्रामीण रुग्णालयात पालकांनी बाळाला दाखल केल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार करून पालकांच्या ताब्यात दिले. मात्र घरी गेल्यानंतर उलटीचा त्रास होऊन नाका तोंडात उलटीचे द्रावण गेल्याने त्याची प्रकृती खालावली असावी. आम्ही बाळावर प्रामाणिकपणे आवश्यक ते सर्व उपचार करूनही बाळ दगावले. यात सटाणा ग्रामीण रुग्णालयाचा कोणताही दोष नाही." 
- डॉ.एन.एस.बांगर, वैद्यकीय अधीक्षक, सटाणा ग्रामीण रुग्णालय

- "पाच दिवसांच्या बाळाचा मृत्यू ही अतिशय गंभीर घटना आहे. बालमृत्यू, कुपोषण रोखण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. गर्भवती महिला अथवा प्रसूती झालेली माता आणि बाळ यांना आरोग्य सुविधा पुरवणे शासन नियमानुसार अत्यंत आवश्यक आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."
- जितेंद्र इंगळे पाटील तहसीलदार बागलाण

- "ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र व सटाणा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे आमचे बाळ दगावले आहे. वेळेवर उपचार व सुविधा मिळाली असती तर आमचे बाळ आज हयात असते. शासनाने दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा."                                         - अभिमन शिवदास पिंपळसे, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com