नागपंचमीनिमित्त अभिनव उपक्रम, सफर सापांच्या दुनियेची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

निफाड - 'शेतकऱ्यांचा खरा मित्र' आणि 'अन्न साखळीतील महत्वाचा दुवा' असलेल्या सापांची केवळ भीती पोटी मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. सापांबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रध्दा दूर करण्यासाठी वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी नागपंचमी सणाचे औचित्य साधून विद्यार्थी व पालकांना सापांच्या दुनियेची सफर घडवली.

निफाड - 'शेतकऱ्यांचा खरा मित्र' आणि 'अन्न साखळीतील महत्वाचा दुवा' असलेल्या सापांची केवळ भीती पोटी मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. सापांबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रध्दा दूर करण्यासाठी वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी नागपंचमी सणाचे औचित्य साधून विद्यार्थी व पालकांना सापांच्या दुनियेची सफर घडवली.

साप... म्हटले तरी प्रत्येकाच्या मनात भीती असते. गोरख सानप यांनी सापांच्या विषारी जाती, बिनविषारी जाती, पानसर्प, सापांचे अन्न, सर्पदंशाची लक्षणे व त्यांवर करावयाचे प्रथमोपचार, वन्यजीव संरक्षण कायदा, सापांचे विष त्याचे प्रकार व उपयोग, जनसामान्य लोकांमध्ये असलेले गैरसमज व अंधश्रद्धा यांवर चित्रमय भित्तीपत्रिका तयार केल्या. या भित्तीपत्रिकांच्या प्रदर्शनाचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. वैनतेय प्राथमिक, वैनतेय इंग्लिश मेडिअम व वैनयेय विद्यालयातील विदयार्थी व पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. साप दिसल्यास कोणती खबरदारी घ्यायची तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार कसे करावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.

याप्रसंगी नागपंचमी सणाचे महत्व सांगण्यात आले. चिमुकल्यांनी नागोबाच्या प्रतिमेची आघाड्यांच्या पानांचा हार घालून पूजन केले. लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. 'सर्पमित्राची मदत घेऊ सापाला जीवदान देऊ', नागोबा वाचवा पर्यावरण वाचवा, सापाला जगवूया पर्यावरणाचे रक्षण करू या, अंधश्रद्धा दूर करा सापांचे रक्षण करा, साप आहे शेतकऱ्यांचा मित्र हेच आहे पर्यावरणाचे सूत्र यांसारख्या घोषणांनी जनजागृती केली. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला.

सण-उत्सवामधील भारतीय संस्कृतीची जपणूक करत प्राणिमात्रांचे जतन करून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, अॅड. ल. जि. उगावकर, राजेश राठी, किरण कापसे, राजेश सोनी, अॅड. दिलीप वाघावकर, मधुकर राऊत,  प्रभाकर कुयटे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, केंद्रप्रमुख व्ही. के. सानप, मुख्याध्यापिका अलका जाधव व पालकांनी कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव व शिक्षकांनी प्रयत्न केले.

सापांबद्दल गैरसमज व अंधश्रद्धा-
- साप दूध पितो.
- साप डूख धरतो.
- नाग धनाचे रक्षण करतो.
- मांडूळ सापाच्या मदतीने गुप्तधन शोधता येते.
- सापाला संगीत आवडते,साप गारुड्याच्या बिनीवर डोलतो.
- धामण साप गायीच्या  किंवा म्हशीच्या पायाला विळखा मारून दूध पितो.
- मंत्राने सापाचे विष उतरते.
- सापाची नजरानजर झाली तर दुभती जनावरे दूध देत नाही.
- साप एका रूपातून दुसऱ्या रुपात जाऊ शकतो.
- मंत्राने साप नियंत्रित करता येतो.
 यांसारख्या अनेक गैरसमजुती व अंधश्रद्धा विद्यार्थ्यांच्या मनातून वैज्ञानिक दाखले देऊन दूर करण्यात आल्या.

सापांची वेगवेगळ्या प्रकारची चित्र आणि माहिती समजून घेतल्याने सापांची भीती नाहीशी झाली. साप दिसल्यास कोणती खबरदारी घ्यायची हे समजले.सर्पमित्रांची मदत घेऊन सापांचा जीव वाचवण्याचा संकल्प केला आहे."
चि. शौर्य व्यवहारे, विद्यार्थी, वैनतेय विद्यामंदिर निफाड

Web Title: Innovative activities of Nagpanchami