"समाजस्वास्थ्य'ने केले रसिकांना अंतर्मुख 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नाशिक - परंपरागत बुरसटलेल्या विचारांशी स्वातंत्र्यपूर्व काळातच लढा द्यावा लागला नाही, तर आजही तो लढा सुरूच आहे. संततीनियमन, लैंगिक शिक्षण आणि स्त्री-पुरुष निकोप संबंधासाठी आयुष्य वेचणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावरील समाजस्वास्थ्य नाटकाने रसिकांना अंतर्मुख केले. गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली कर्वेंची भूमिका, अजित दळवी यांची संहिता आणि त्याला लाभलेली अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनाची साथ यामुळे ही नाट्यकृती अतिशय सुंदर झाली. 

महाकवी कालिदास कलामंदिरात प्रमोद गायकवाड, सचिन शिंदे, दत्ता पाटील आणि मित्रमंडळींतर्फे नाटकघर पुणेनिर्मित "समाजस्वास्थ्य' या दोन अंकी नाटकाचा प्रयोग झाला. दिग्दर्शक पेठे यांचा लोकेश शेवडे यांच्या हस्ते सत्कार झाला. श्री. पेठे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. 

ज्या काळात लैंगिक शिक्षण, संततीनियमनाविषयी साधा शब्द उच्चारणेही कठीण बाब होती, त्या काळात कर्वे यांनी समाजस्वास्थ्य मासिकाच्या माध्यमातून या विषयावर आवाज उठविला. स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष संबंधाविषयी त्यांनी मासिकातून मोकळेपणाने लिखाण केले. राहत्या घरीच त्यांनी संततीनियमनाचे केंद्र सुरू केले. या कामासाठी त्यांनी पत्नी मालती यांचीही मदत घेतली. लैंगिक शिक्षणाबद्दल त्यांनी जनजागृतीचा ध्यासच घेतला होता. लैंगिकतेविषयी मासिकातून मोकळेपणाने लिहिल्याने कर्वे यांच्यावर खटला दाखल होतो. त्या काळातील समाजातील बुरसटलेल्या विचारांमुळे त्यांच्यावर खटला दाखल होतो. खटल्यात त्यांना शंभर रुपये दंड केला जातो. मात्र, त्यांचे कार्य अविरत सुरूच राहते. एक खटला संपला, की लगेच त्यांच्यावर दुसरा खटला दाखल होत असे. मासिकाच्या प्रती, हस्तलिखीत जप्त केले जाते. या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही कर्वे यांच्याबरोबर होते. त्यांनीही कर्वे यांचे वकीलपत्र घेऊन त्यांची बाजू मांडली होती. खटला लढत असताना कर्वेंची आर्थिक परिस्थिती खालावते. त्यानंतर त्यांना वकील देणेही शक्‍य नसते, म्हणून ते स्वतःच खटला लढवितात. समाजस्वास्थ्य मासिकासाठी ते आयुष्य पणाला लावतात. 

नाटकात कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही. जसे घडले तसेच हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकातील घटनेला साजेसे नेपथ्य होते. प्रकाशयोजनाही उत्तम होती. 

गिरीश कुलकर्णी यांनी कर्वेंची, तर राजश्री सावंत-वाड यांनी मालती यांची भूमिका साकारली. प्रदीप मुळ्ये (नेपथ्य), नरेंद्र भिडे (संगीत), प्रदीप वैद्य (प्रकाशयोजना), माधुरी पुरंदरे (वेशभूषा), आशिष देशपांडे (रंगभूषा) यांनी तांत्रिक जबाबदाऱ्या सांभाळल्या.

Web Title: Inspired by social health