रुग्णालय, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

जळगाव - महापालिकेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू असून, आज महापालिका रुग्णालय, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. उर्वरित विभागांच्या लवकरच बदल्या केल्या जातील, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. 

जळगाव - महापालिकेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू असून, आज महापालिका रुग्णालय, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. उर्वरित विभागांच्या लवकरच बदल्या केल्या जातील, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. 

महापालिकेत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया झालेली नव्हती. शासनाच्या नियमानुसार आयुक्त सोनवणे यांनी आठ दिवसांपूर्वी सुरू केलेल्या बदलीप्रक्रियेत प्रभाग समिती, अतिक्रमण, अग्निशमन या विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानुसार आज पाणीपुरवठा विभागातील प्लंबर, व्हॉल्व्हमन अशा १२२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तसेच महापालिकेतील दवाखान्यामधील ७९ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. 

बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेले विभाग

महापालिकेतील अग्निशमन विभाग, आरोग्य, वाहन विभाग, वाहनचालक, तसेच बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना विभागातील अभियंते व महापालिका शाळांमधील शिक्षक यांच्या बदल्या अजून होणे बाकी आहे. या विभागातील बदल्यांचा अहवाल उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार हे लवकरच आयुक्तांकडे देणार आहेत, अशी माहिती मिळाली.

वाहनचालकांची ओळखपरेड 
महापालिकेच्या वाहनचालकांची आज दुपारी तीनला ओळख परेड द्वितीय मजल्यावरील सभागृहात उपायुक्त डॉ. कहार यांनी घेतली. दोन टप्प्यांत घेण्यात येणाऱ्या ओळखपरेडमध्ये आज ४५ वाहनचालकांची ओळखपरेड घेतली. उर्वरित वाहनचालकांची उद्या ओळखपरेड घेतली जाणार आहे.  यामध्ये कोणत्या वाहनावर, कोणत्या विभागात, नेमके काय काम करतात, याबाबत माहिती उपायुक्तांनी ओळखपरेडमधून जाणून घेतली. 

कामचुकार कर्मचारी ‘रडार’वर
महापालिकेतील बदलीप्रक्रिया व ओळखपरेडच्या माध्यमातून आयुक्त सोनवणे हे कामचुकार कर्मचाऱ्यांची माहिती घेत आहेत. तसेच कोणत्या विभागात अतिरिक्त भार आहे, काम कमी आहे याचा आढावा घेत  आहे. स्वाक्षरीबहाद्दर कर्मचारीदेखील आयुक्तांच्या ‘रडार’वर असल्याची माहिती मिळाली.

Web Title: Internal transfers of employees