अंतर्गत जलवाहिनीचे ६२ टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

तांत्रिक अडथळ्यांची शर्यत
या सर्व कामात तांत्रिक अडचणी बऱ्यापैकी येत आहेत. त्यात जलवाहिनीच्या कामात रस्त्यांवरील अतिक्रमण, काही जलवाहिन्या टाकण्यासाठी आराखडा अपूर्ण, रेल्वे व महामार्गाच्या हद्दीतील कामांसाठी परवानगी, व्हॉल्व्ह संख्या व चेंबरच्या जागांबाबत प्रलंबित निर्णय, खासगी जागेत जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी, लोखंडी पाइपचा पुरवठा या अडचणी आहेत. तर जलकुंभाच्या कामांमध्ये जागेचा ताबा व निविदेतील दराबाबत निर्णय होणे बाकी असल्याचेही एजन्सीने म्हटले आहे.

जळगाव - शहरातील ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम घेणाऱ्या ‘जैन इरिगेशन’ या मक्तेदार एजन्सीने शहरात या पहिल्या टप्प्यातील कामात अंतर्गत जलवाहिन्यांचे ६२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. उर्वरित कामांमध्ये तांत्रिक कारणांमुळे अनेक अडचणी येत असून, काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची भूमिकाही एजन्सीने एका पत्रकान्वये मांडली आहे.

गेल्या दीड वर्षापूर्वी शहरात ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले. मक्तेदार एजन्सी म्हणून जैन इरिगेशनने हे काम घेतले असून, ते दोन वर्षांत म्हणजे नोव्हेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, त्यातील बरेचसे काम अपूर्ण असल्याने ते मुदतीत पूर्ण होण्याची शक्‍यता नाही. शिवाय, या कामासाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आता ऐन पावसाळ्यात त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, महापालिका प्रशासनासह जैन इरिगेशनबद्दलही नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘जैन’ने या योजनेच्या प्रत्यक्ष कामाचा आढावा सादर केला आहे. 

अंतर्गत वाहिन्यांचे ६२ टक्के काम
‘अमृत’अंतर्गत शहरात एचडीपीई जलवाहिनी अर्थात नागरी वस्त्यांमधील अंतर्गत वाहिन्यांचे ५८४ किलोमीटरपर्यंतचे काम होते. त्यापैकी ३६० किलोमीटर काम (६२ टक्के) पूर्ण झाले आहे. डीआय जलवाहिनीत रायझिंग मुख्य जलवाहिनीचे ५.२. किलोमीटरचे काम पूर्ण बाकी आहे. डीआय ग्रॅव्हिटी मेन जलवाहिनीच्या १६.८ कि.मी. कामापैकी ५.२ कि.मी. (३१ टक्के) काम झाले असून, डीआय वितरण वाहिनीच्या ५७.५ कि.मी. कामापैकी २५.५ (४४ टक्के) काम झाल्याचा दावा ‘जैन’ने केला आहे.

१३ हजार नळ कनेक्‍शन दिले
‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिन्यांच्या कामासह शहरात सुमारे ७५ हजार नळ कनेक्‍शन देण्याचे प्रस्तावित आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ १३ हजार ५८० (१८ टक्के) नळ कनेक्‍शन देण्यात आले आहेत. अंतर्गत जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम गतिमान होऊ शकेल. 

जलकुंभांचे कामही प्रगतिपथावर
पाणीपुरवठा योजनेच्या कामात शहरातील विविध भागात ११ जलकुंभ प्रस्तावित आहेत. त्यापैकी नित्यानंदनगर जमिनीतील टाकी (७५ टक्के), नित्यानंदनगर उंच टाकी (२२ टक्के), सुप्रिम कॉलनी (६५ टक्के), निमखेडी (२२), सुप्रिम कॉलनी जमिनीतील टाकी (३५), गेंदालाल मिल उंच जलकुंभ (५८), एमआयडीसी उंच जलकुंभ (९ टक्के), रेमंड उंच टाकी (२२ टक्के) काम झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internal Waterline 62 percentage work complete Amrut Scheme