पदकांचा बादशहा सरकारकडून बेदखल..!

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

जळगाव - ‘झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजं नसतात’, ही उक्ती भुसावळ येथील आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार..! यांच्या बाबतीत सार्थ ठरते. भवार हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी. वयाच्या नव्वदीत भवार यांनी गेल्या कालावधीत ३५ व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य पदक पटकावले. लोकप्रतिनिधींनी मात्र फारशी दखल घेतली नसल्याची खंत ते व्यक्त करतात.

भवार यांच्या आयुष्याच्या शर्यतीत त्यांनी सरावाची पासष्टी पूर्ण केली आहे. साधारण मे १९५० पासून धावण्याचा सराव करून स्पर्धांमध्ये ते निरंतर सहभागी होत आहेत. त्यांच्या सरावाला तब्बल ६५ वर्षे आठ महिने पूर्ण झाली आहेत. पत्नी साधना यांची त्यांना साथ आहे. देश - विदेशातील स्पर्धा गाजवल्या असल्या तरी भवार यांना सरकारचा कोणताही पुरस्कार मिळालेला नाही. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सरकारला पूर्ण विसर पडला आहे, हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सेवानिवृत्तीच्या वेतनात काटकसर करत आपल्या छंदाची जोपासना या अवलियाने केली. दररोज किती रुपये खर्च केले याचा सविस्तर हिशेब ते आपल्या डायरीत लिहून ठेवतात. तीस वर्षे हा नित्यनियम ते पाळत आहेत.

मिल्खा सिंगची शाबासकी
भवार यांनी राष्ट्रीय आशियाई मॅरेथॉन स्पर्धांमध्ये आजमितीस ३० सुवर्ण, २० रौप्य आणि २२ ब्राँझपदके पटकावली आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तर पदकांचे शतक गाठले आहे. या सर्व पदकाचे वजन हे तब्बल सात किलो आहे. शिवाय घरात तीन सुटकेस भरून प्रमाणपत्रदेखील आहेत. जुन्या आठवणीत रमताना भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांनी दिलेल्या शाबासकीचा भवार आवर्जून उल्ल्लेख करतात.

‘आम्ही मीटरच्या स्पर्धेत धावणारे खेळाडू आहोत; आपण तर किलोमीटरमधील धावपटू आहात’, अशी दाद मिल्खा सिंग यांनी एका स्पर्धेच्या भेटी दरम्यान दिली होती. आयुष्यात सर्वाधिक काळ सरावात व्यतीत केला. देश - विदेशातील स्पर्धा गाजवल्या असल्या तरी, सरकारकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही याची खंत वाटते
- आर. बी. भवार, आंतरराष्ट्रीय धावपटू

खेळ चिरतरुण
दीड हजार मीटर, पाच हजार आणि १५ हजार मीटर धावणे हे त्यांचे हुकमत सिद्ध करणारे क्रीडाप्रकार आहेत. त्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. दररोज न चुकता दहा किलोमीटर धावणे, कामासाठी सायकल प्रवास करणे, ही त्यांची विशेष खासियत. वय झाले तरीही त्यांनी आपला खेळ मात्र चिरतरुण ठेवला आहे, हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com