International Tiger Day : दहा वाघ असूनही व्याघ्र प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

सचिन जोशी
सोमवार, 29 जुलै 2019

मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्र
वन्यजीव संस्थेच्या वतीने या क्षेत्राच्या विकासासाठी व व्याघ्र संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यातून २०१३मध्ये तत्कालीन वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी वढोदा वनक्षेत्राला भेट दिली. नंतर २०१४मध्ये या क्षेत्राला मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्राला दिलासा मिळाला असला तरी तो पुरेसा नाही.

जळगाव - जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत तीन पट्टेदार वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. जळगाव वनविभागात वढोदा क्षेत्रात सात-आठ आणि यावल वनक्षेत्रात दोन असे सुमारे दहा वाघ जिल्ह्यात आहेत. एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करून अभियान राबविले जात असताना दहा वाघ असूनही जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा मिळालेला नाही. वन्यजीव संस्थेच्या पाठपुराव्यानंतर मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्प म्हणून घोषणा झाली असली तरी वाघांच्या संवर्धनासाठी तेवढे पुरेसे नाही. 

सातपुडा पर्वतराजीने  वेढलेल्या जळगाव जिल्ह्याला मोठी वनसंपदा लाभलेली आहे. केवळ सातुपड्याला लागून असलेल्या यावल अभयारण्यातच नव्हे तर मुक्ताईनगर तालुक्‍यातील वढोदा वनक्षेत्रात दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आहे. व्याघ्र संवर्धनाच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च दरवर्षी होत असताना वढोदा व यावल वनक्षेत्रातील वाघांना वाचविण्याबाबत मात्र शासन यंत्रणा कमालीची उदासीन आहे. 

जिल्ह्यात दहा वाघ
सुरवातीला जळगाव जिल्ह्यात पट्टेदार वाघ नाहीच, असा दावा केला जायचा. परंतु, गेल्या काही वर्षांत वाघांच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे समोर आलेच, शिवाय स्थानिकांना या दोन्ही वेगवेगळ्या वनक्षेत्रात अनेकदा वाघांचे दर्शनही झाले. जळगाव वनविभागांतर्गत मुक्ताईनगर तालुक्‍यातील वढोदा क्षेत्रात सद्य:स्थितीत सात-आठ वाघ आहेत. तर यावल अभयारण्यातही दोन वाघांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. 

वाघांच्या मृत्यूच्या घटना
गेल्या दोन-तीन वर्षांत वाघांच्या मृत्यूच्या दोन-तीन घटना घटल्या. दोन वर्षांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्‍यात थेरोळा गावालगत पूर्णा नदीपात्रात वाघाचा मृतदेह आढळून आला. शेतीच्या संरक्षणासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. नंतर काही दिवसांनी याच परिसरात वेगवेगळ्या घटनांत दोन वाघांचा मृत्यू झाला. 

वाघांचा संचारमार्ग
विदर्भातील मेळघाट-अंबाररुआ ते वढोदा-यावल आणि पुढे जाऊन अनेर तर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे गौताळा अभयारण्य असा वाघांचा विस्तीर्ण संचारमार्ग आहे. यावल वनक्षेत्र केवळ १७७ चौरस किलोमीटरचे असून वढोदा वनक्षेत्राचे क्षेत्रफळही मर्यादित असल्याने वाघांच्या अधिवासाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

... तर व्याघ्र पर्यटन विकास
परिणामी, वढोदा व यावल वनक्षेत्राला अभयारण्य अथवा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास वाघांच्या संवर्धनाचे काम सोपे होऊ शकेल. शिवाय, मेळघाट- वढोदा- यावल- अनेर, तोरणमाळ व पुढे शूलपाणेश्‍वर (डांग, गुजरात) या क्षेत्रापर्यंत वाघांना संचारमार्ग उपलब्ध झाल्यास हा संपूर्ण परिसर व्याघ्र पर्यटन म्हणूनही विकसित होऊ शकेल.

वढोदा व यावल वनक्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळावा अथवा किमान धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र (critical wildlife habitat) म्हणून दर्जा मिळण्यासाठी वन्यजीव संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी उपवनसंरक्षक डिगंबर पगार यांच्या अध्यक्षतेत एक समितीही स्थापन झाली आहे. 
- राजेंद्र नन्नवरे, पर्यावरण विषयाचे अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Tiger Day Tiger Project