कापडणे पाणी योजनेच्या चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

शासनाच्या रकमेचा दुरुपयोग करणाऱ्यांना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्री रावल यांनी वरील आदेश दिले

धुळे - कापडणे गावासाठी सुमारे तीन कोटी 11 लाख रुपये खर्चून झालेली पाणी योजना कुचकामी ठरल्याने गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रश्‍नी ग्रामस्थांनी केलेले आंदोलन अन तक्रारींची दखल घेत या योजनेच्या चौकशीचे आदेश रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज जिल्हा परिषदेला दिलेत. येत्या आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या योजनेबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी व योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी आज ग्रामस्थांनी भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बापू खलाणे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री रावल यांची येथील विश्रामगृहावर भेट घेऊन निवेदन दिले. त्यात योजनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

"शासनाने कोट्यवधी रुपये देऊनही आज गावाला शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नाही. योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्यामुळे योजना आज निरुपयोगी ठरली आहे. जलकुंभही अधांतरी आहे. शासनाच्या रकमेचा दुरुपयोग करणाऱ्यांना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्री रावल यांनी वरील आदेश दिले.

कापडणे ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांचीही भेट घेऊन या योजनेची 2008 पासून ते आजपर्यंत चौकशीची व गावास शुद्ध पाणी मिळण्याबाबत विनंती केली. श्री. देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. चौकशी समितीत कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा)पढियार यांनी आर. व्ही. महाजन (उपअभियंता, शिंदखेडा) अजय बिरारी शाखा अभियंता शिंदखेडा, सहाय्यक लेखाधिकारी तुषार बोरसे यांची नियुक्ती केली आहे. ही चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपचे प्रदेश पदाधिकारी बापू खलाणे, तालुकाध्यक्ष राहुल पाटील, माजी सरपंच किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, महेंद्र भामरे, भटू पाटील, सुशील माळी, राजेंद्र माळी, प्रकाश सीताराम पाटील, ललित बोरसे, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, कपिल बोरसे, योगेश पाटील, योगेश बाविस्कर उपस्थित होते.

Web Title: investigation regarding water supply scheme