नाशिक - पुणे हवाईसेवेला विराम; मुंबईचे उड्डाण बेभरवशाचे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

नाशिक : एअर डेक्कनकडून हवाईसेवेचे नवीन शेड्युल जाहीर करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मुंबई वगळता पुण्याची सेवा परस्पर बंद केली आहे. मुंबईच्या सेवेबाबतही अनियमितता असल्याने फक्त "उडान' योजनेंतर्गत सरकारी अनुदान लाटण्याचा प्रयत्न विमानसेवा कंपन्यांकडून होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

नाशिक : एअर डेक्कनकडून हवाईसेवेचे नवीन शेड्युल जाहीर करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मुंबई वगळता पुण्याची सेवा परस्पर बंद केली आहे. मुंबईच्या सेवेबाबतही अनियमितता असल्याने फक्त "उडान' योजनेंतर्गत सरकारी अनुदान लाटण्याचा प्रयत्न विमानसेवा कंपन्यांकडून होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

एअर डेक्कनतर्फे उडान योजनेंतर्गत नाशिक - मुंबई व नाशिक - पुणे विमानसेवा डिसेंबर 2017 पासून सुरू झाली. नाशिककरांनी 19 सीटरच्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिला. नाशिक- पुणे सेवा सुरळीत होती, पण मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने वेळ अनियमित झाली. प्रारंभी सकाळी नाशिकहून मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होते. त्यानंतर दुपारी बाराला वेळ निश्‍चित झाली. काही दिवसांनंतर पुन्हा वेळापत्रक विस्कळित झाले. कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींनी नाशिकहून प्रतिसाद मिळत नसल्याची कारणे वरिष्ठांना दिल्याने सेवा स्थगित करण्यात आली.

15 एप्रिलपासून सेवा पूर्ववत करताना वेळेचे नवीन शेड्युल जाहीर झाले. त्यात सकाळी सहाला मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होईल, तर पुण्याची वेळ कायम ठेवण्यात आली होती; परंतु मुंबईच्या वेळेत अजूनही अनियमितता असून, पुण्याची सेवा कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. 

कशासाठी खटाटोप? 
एअर डेक्कन विमान कंपनीमार्फत ओझर विमानतळावरून हवाईसेवा सुरू करण्यात आली. सुरवातीला नाशिकचे महत्त्व कंपनीकडूनच स्पष्ट करण्यात आले; परंतु सुरवातीचे एक-दोन दिवस वगळता सेवेचा बोजवारा उडाला. प्रवाशांचा दोष नसताना कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने पंधरा दिवसांसाठी सेवा बंद केली. त्यानंतर 15 एप्रिलपासून सेवेचे नवीन शेड्युल जाहीर केले. त्यात मुंबई व पुण्यासाठी नवीन वेळा जाहीर केल्या.

नवीन वेळा जाहीर होऊनही नाशिक - पुणे हवाईसेवा कंपनीने परस्पर बंद केली, तर मुंबईचे उड्डाण अद्याप वेळेत नाही. कंपनीकडून फक्त सेवा सुरू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्याला कारण म्हणजे "एचएएल'चे विमानतळ पार्किंगसाठी मोफत उपलब्ध तर होतेच. शिवाय "उडान' योजनेंतर्गत इंधनदेखील स्वस्तात मिळत असल्याने कंपनीला फायदा होत आहे. 

Web Title: Irregular flights from Nashik to Pune by Air Deccan