नाशिक, नगरमधील पाटबंधारे निधी तापी खोऱ्यात वळविण्याच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

नाशिक - नाशिक व नगर जिल्ह्यांतील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद झालेली; परंतु वेगवेगळ्या कारणांनी वर्षभरात खर्च न झालेली मोठी रक्‍कम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यक्षेत्रातील तापी पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या मते ही रक्‍कम दोनशे कोटींहून अधिक असून, गोदावरी खोऱ्यातील लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून या निधीची वळवावळवी सुरू आहे.

विशेषतः नगर जिल्ह्यातील निळवंडे आणि नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा वळण योजनेमधील ही अखर्चित रक्‍कम असून, ती तापी पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करावी, अशा सूचना औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील अधीक्षक अभियंते व अन्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महामंडळाच्या विविध कार्यालयांकडून अशा अखर्चित रकमांची माहिती मागविण्यात आली आहे. याबाबत गेल्या 7 मार्चला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे एक पत्र पाठविले असून, त्यात अखर्चित रकमांचे तपशील, तसेच हा निधी अन्यत्र वळविण्यासंदर्भातील अभिप्राय मागविण्यात आला आहे. "सकाळ'ने विचारणा केली असता, अशी कोणतीही रक्‍कम तापी महामंडळाकडे वळती करणार नसल्याचे श्री. कोहीरकर यांनी सांगितले.

राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर असताना अशारीतीने राजकीय लाभासाठी एका महामंडळाच्या कार्यक्षेत्रातून दुसरीकडे निधी वळविण्याचे प्रकार अनेकदा घडले होते. त्यावरून वादंगही माजले होते. विशेषत: विदर्भ व मराठवाड्यातील निधी कृष्णा खोऱ्यात वळविण्याच्या मुद्द्यावर तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या सत्ताकाळात असे पहिल्यांदा घडत आहे आणि तेदेखील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर.

Web Title: Irrigation Fund Issue Girish Mahajan