
Dhule News : धुळ्याचा विधिमंडळात घुमला आवाज; कुणाल पाटलांनी विविध प्रश्नांना फोडली वाचा
धुळे : महापालिका हद्दीत समाविष्ट धुळे ग्रामीण विधानसभा (Assembly) मतदारसंघातील ११ गावांच्या वाढीव मालमत्ता कराचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला.
महापालिकेने पुरेशा सोयी-सुविधा दिलेल्या नसताना वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा दिल्या. (issue of increased property tax of 11 villages in Rural Assembly Constituency included in municipal limits came up in session of Legislature dhule news)
त्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे वाढीव कर रद्द करावा किंवा सरकारने या करासाठी निधीची तरतूद करावी. सरकारनेच हा वाढीव मालमत्ता कर भरावा, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी विधिमंडळातील भाषणात केली.
धुळे शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी, मनपा हद्दीतील ११ गावांबरोबरच शहरातील रस्त्यांचाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी करीत शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, कचऱ्याचाही प्रश्न आमदार पाटील यांनी मांडल्याने अधिवेशनात धुळ्याचा आवाज घुमला.
अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करीत आमदार पाटील यांनी धुळे शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवीत तातडीने निराकरणाची मागणी केली. अधिवेशनात चर्चेवेळी ते म्हणाले, की धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ११ गावांचा धुळे महापालिका हद्दीत समावेश झाला.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
या गावांतील रहिवाशांना मालमत्तांना वाढीव कर आकारण्यात आल्याने संतापाचे वातावरण आहे. मनपाने मूलभूत सुविधांबरोबर या ११ गावांमध्ये कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. पाणीप्रश्न, रस्ते, पथदीप, गटारी, शौचालय, आरोग्य, स्वच्छता अशी तत्सम कोणतीही विकासाची कामे झाली नाहीत. तरीही महापालिकेने संबंधित रहिवाशांना वाढीव मालमत्ता करवसुलीच्या नोटिसा दिल्या आहेत.
विकासकामे नसल्याने वाढीव कर का भरावा, असा संबंधित रहिवाशांचा प्रश्न आहे. वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणीही केली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हा प्रश्न सोडवावा.
धुळे शहरात आठ ते पंधरा दिवसांत पाणीपुरवठा होत असतो. हा प्रश्न सुटावा यासाठी अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात येत आहे. या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. या योजनेच्या कामाला गती देऊन धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडवावा, अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली.
धुळे शहरात भूमिगत गटारींचे काम महापालिकेकडून केले जात आहे. मात्र मध्यंतरी ही योजना अर्धवट सोडल्याने शहरातील रस्त्यांचे विद्रूपीकरण झाले आहे. शहरात रस्ते खोदले गेल्याने सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत. परिणामी चालणेही अशक्य झाले आहे. रखडलेल्या भूमिगत गटारीच्या योजनेत लक्ष घालून रस्त्यांचे काम करण्याचीही मागणी आमदार पाटील यांनी केली.
कचऱ्याचा प्रश्न गाजला
शहरात वाढत चाललेले घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याच्या प्रश्नाने नेहमीच धुळेकरांना सतावले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कचऱ्याचा प्रश्न गाजत आहे. कचरा ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून, सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
कचरा ठेकेदाराने कोणतेही काम केले नसल्याने त्याला वाचा फोडण्याचे काम या पदाधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे धुळे शहर स्वच्छ राहावे, नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे म्हणून धुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशीही मागणी विधिमंडळ अधिवेशनात केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.