महाविद्यालयांना विद्यार्थी हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याची सक्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

वणी (नाशिक) : राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरु करण्याचे आदेश १५ जुन रोजी जारी करण्यात आला आहे. महाविद्यालय ही पद्धती अवलंबविणार नाहीत त्यांची मान्यता काढून घेण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

वणी (नाशिक) : राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरु करण्याचे आदेश १५ जुन रोजी जारी करण्यात आला आहे. महाविद्यालय ही पद्धती अवलंबविणार नाहीत त्यांची मान्यता काढून घेण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

राज्यभरात खाजगी क्लासेसचे मोठ्याप्रमाणात पेव सुटले असून, खाजगी क्लासचालकांच्या वाढत्या प्रभावापुढे अनेक महाविद्यालयांनी गुडघे टेकले आहेत. पालकांचाही ओढा अफाट फीस भरून पाल्याने खाजगी क्लास करावे याकडेच असल्याने महाविद्यालयातील उपस्थिती रोडावत चालली आहे. विद्यार्थी महाविद्यालयात नियमित उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गालाच उपस्थित राहतात आणि नियमित उपस्थिती खाजगी क्लासमध्ये लावतात. अनेक महाविद्यालयांनी देखील याकरिता पुढाकार घेऊन खाजगी क्लासेस सोबत सामंजस्य करार केला आहे. याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. तसेच विधीमंडळातही अनेकदा हा प्रश्न चर्चिला गेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी विज्ञान शाखेच्या सर्व प्रकारच्या कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

ही योजना टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात येणार असून चालू शैक्षणिक वर्षाकरिता (सन २०१८-२०१९) मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या पाच विभागातील विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून बायोमेट्रिक उपस्थिती घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या १५ जुलै पर्यंत महाविद्यालयांना स्वखर्चाने आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करावी लागणार आहे. यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी अचानक भेट देऊन या यंत्रणेची पाहणी करणार आहेत. जी कनिष्ठ महाविद्यालये हि पद्धती अवलंबविणार नाहीत त्यांची मान्यता काढून घेण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असा इशाराही शासनाने दिला आहे. या निर्णयामुळे खाजगी क्लासचालकांबरोबरच त्यांना समर्थन देणाऱ्या महाविद्यालयांची चांगलेच ढाबे दणानले आहे.

Web Title: It is compulsory for students to take attendance in biometric method