चौथी नापास जग्गू चाललाय थायलंडला

प्रशांत कोतकर
शुक्रवार, 19 मे 2017

"मला स्वप्न पाहायला माझे गुरू यजुर्वेंद्र महाजन यांनी शिकविले. त्यासाठी अपार कष्ट करावे लागले. माझ्या सोबतीला चांगली माणसे आली. मी फक्त कर्म करीत राहिलो. निसर्गाने मला फळ दिले.''
- जगदीश महाजन

नाशिकच्या "इ ऍण्ड जी थ्री'च्या माध्यमातून उद्योजकांबरोबर अभ्यासदौरा

नाशिक, ता. 17 : भाषा ही ज्ञानाची जननी असते. आपल्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला जीवन समृद्ध करणारे अनुभव देत असतात. अनुभव हे शिक्षण देणारे सर्वांत मोठे विद्यापीठ असते. अशाच अनुभवातून आपल्या राजभाषेची अविरत सेवा करणारा चौथी नापास जग्गू नाशिकच्या "इ ऍण्ड जी थ्री'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील 70 उद्योजकांबरोबर अभ्यासदौऱ्यासाठी बुधवारी (ता. 16) थायलंडला निघाला. हा जग्गू म्हणजे दीपस्तंभ प्रकाशनाचे प्रकाशक जगदीश पुंडलिक महाजन.

जगदीश हा मूळचा एरंडोल (जि. जळगाव) येथील. इयत्ता चौथीत असताना वडिलांचे अपघाती निधन झाले. लहान वयात आयुष्याचे आभाळ हरपले. तेव्हा जगदीशने घराला हातभार म्हणून (कै.) डॉ. अनिल महाजन यांच्याकडे कंपाउंडरची नोकरी पकडली. आणि येथून सुरू झाला अनुभवाचा प्रवास. डॉ. महाजन यांनी जगदीशला शिस्त आणि जिद्दीचे धडे दिले. त्यानंतर त्याने भाजीपाला व कुल्फी विकणे, पोल्ट्रीफार्म सांभाळणे, अशी कामे केली. डॉ. महाजन यांच्या निधनानंतर जगदीश त्यांचे पुत्र व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते यजुर्वेंद्र महाजन यांच्याबरोबर राहिला तो आजतागायत. पुण्यात त्याने वृत्तपत्रे वाटणे, विद्यापीठात शिपाई, बॅंकेत शिपाई अशी अनेक लहान-मोठी कामे केली.

दीपस्तंभ प्रकाशनाला 2009 मध्ये सुरवात झाली. प्रकाशन संस्था फक्त पुण्यातच चालतात, असा समाजात तेव्हा समज होता. भविष्यात हा समज प्रकाशक म्हणून जगदीश महाजन व त्यांच्या टीमने खोटा ठरविला. आजपर्यंत 26 पुस्तके त्यांनी प्रकाशक म्हणून प्रकाशित केलेली आहेत, त्यापैकी सहा पुस्तके महाराष्ट्रात "बेस्ट सेलर' ठरलेली आहेत. माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे, ज्येष्ठ समाजसेवक (कै.) जगन्नाथ वाणी, "आयएएस' राजेंद्र भारूड यांसारख्या लेखकांनी दीपस्तंभ प्रकाशनाकडून पुस्तके प्रकाशित करणे, हेच जगदीश यांचे यश आहे. कर्मनिष्ठा, कर्म माहात्म्य या विचारांची कास धरून चार इयत्ता शिकलेले जगदीश राज्यातील अग्रेसर प्रकाशक झालेले आहेत.

Web Title: jagdish mahajan going to thailand