वेतना अभावी शिक्षकांची परवड

जयेश सूर्यवंशी
सोमवार, 19 जून 2017

जेलरोड - जिल्हा बँक व प्रशासन यांच्या श्रेष्ठत्वाच्या लढाईत गुरुजनाची वेतना अभावी परवड झाली आहे.

जेलरोड - जिल्हा बँक व प्रशासन यांच्या श्रेष्ठत्वाच्या लढाईत गुरुजनाची वेतना अभावी परवड झाली आहे. चार महिन्यापासून वेतन व पैसे न मिळाल्याने आपला दैनदीन खर्च व कुटूंबाचा उदरनिर्वाहा साठी कुणी पैसे देत का पैसे असं म्हणण्याची वेळ गुरुजनावर आली आहे.आपल्या घर खर्चासाठी पैश्याची जुळवा जुळव करतांना शिक्षकांच्या नाकी नऊ आले आहेत.त्यामुळे आमच्या वेतनाबाबत  शासनाने उदासीन  भूमिका घेतल्याने पैशाअभावी जगावं कि मरावं अशी अवस्था जिल्हाभरातील शिक्षकांची झालेली आहे.जिल्ह्यातील खाजगी  प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना मार्च महिन्यापासून वेतनापोटी  एक फूटकी कवडीही जिल्हा बँकेतून  मिळाली नसल्याने शिक्षकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.त्यात जून महिना उजाडल्याने नवीन शैक्षणिक सत्रात आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाची पूर्तता कशी करावी असा सवाल सर्वानाच सतावत आहे.शिवाय अनेक शिक्षकांनी बँकांकडून घेतलेल्या गृह कर्जाचे तीन महिन्याचे हप्ते न भरल्याने बँकांकडून पैश्यासाठी तगादा सुरु आहे.एकीकडे पैशाअभावी कुटूंबाची होत असलेली परवड व दुसरीकडे वेतना बाबत शासकीय पातळीवरून कासव गतीने होत असलेले प्रयत्न यामुळे अनेक शिक्षक मानसिक तणावाखाली वावरत आहेत.प्रशासनाने 337 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांच्या घोटाळ्या बाबतीत जिल्हा बँकेला  जबाबदार धरल्याने  रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध आणत जिल्हा बँकेला चलन पुरवठा खंडित केल्याने संपूर्ण जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळातील हजारो शिक्षकांना त्यांच्या खात्यातील  शिल्लक  व हक्काचे वेतनाचे  पैसे चार महिन्यापासून काढता येत नसल्याने.

अनेक शिक्षकांना आपल्या  कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हा बँकेतील  जुन्या नोटांचा आर्थिक बाब व प्रशासन यांच्यात शिक्षकांचा नाहक बळी दिला जातो आहे.प्रशासनाने जिल्यातील शिक्षकाचे वेतन यापुढे आय डी बी आय बँके मार्फत होतील असा शासकीय फतवा काढला आहे.परंतु त्याला हि अजून मुहूर्त सापडला नसून एकोनाविस जूनला वेतनाची खाते उघडण्या संदर्भात मुख्याध्यापकांची कार्यशाळा दोन दिवस लांबवली असून ती आत्ता 21 जूनला होणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. एकूणच काय तर वरिष्ठ पातळीवरून शिक्षकांच्या वेतनाबाबत अजूनही तारीख पे तारीख च सुरु असल्याने  वेतना साठी  अजून किती दिवस तिष्ठत रहावे लागेल या विचारानेच अनेक शिक्षक हतबल झाले आहेत.आमचे वेतन कोणत्याही  बँके मार्फत करा फक्त लवकरात लवकर करा अशी अनेक शिक्षकांची मागणी असल्याचे सकाळ ला सांगितले.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील खाजगी व माध्यमिक शाळातील हजारो शिक्षकांच्या वेतना बाबत प्रशासनाने घोंगडे भिजत ठेवले आहे.वेतन कोणत्या बँकेमार्फत करायचे यासाठी गत चार महिन्यापासून शिक्षक व त्यांच्या कुटूंबियांना वेठीस धरले जात आहे.पैशाअभावी आपला दैनंदिन खर्च व कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी गुरुजनाची होत असलेली  परवड बघता हेच का अच्छे दिन असे वाटते.आर्थिक चनचणीतून एखादया शिक्षकाचा बळी गेला तर त्याच्या कुटूंबांने कुणाच्या तोंडाकडे बघावे ?निदान याची जाणीव ठेवून तरी प्रशासनाने शिक्षकांच्या वेतनाचा तिढा तात्काळ सोडवावा हीच अपेक्षा.

- धनंजय पाटील,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघट्ना.

Web Title: jail road nashik news teachers for want of wages