होय, कारागृहाच्या भिंती ठेंगण्याच!

District-Jail-jalgaon
District-Jail-jalgaon

जळगाव - जिल्हा कारागृहातील दोन कैद्यांनी भिंत ओलांडून पळ काढला असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आज कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी कारागृहाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात जिल्हा कारागृहाच्या भिंतीची कमी उंची आणि सहा कैद्यांमागे एक शिपाई असणे अपेक्षित असताना ४५० कैद्यांची जबाबदारी केवळ ४० पोलिसांवर असल्याने कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे कबूल केले. 

चोरीच्या गुन्ह्यातील संशयित शेषराव सोनवणे व रवींद्र मोरे असे दोघा संशयितांनी बुधवारी कारागृहाची तटबंदी भेदून पळाले आहेत. घडल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई जळगाव जिल्हा कारागृहाच्या पाहणीसाठी धडकले. कारागृहाची पाहणी करून संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले. बंदीवानांना बॅरेक मधून बाहेर काढल्यावर त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्‍यक असताना दोघांना सोडून कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असून विभागीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारागृहातील इतर विषयाबाबत प्रभारी अधीक्षक अनिल वाढेकर यांच्याकडून याप्रकरणी माहिती जाणून घेतली. 

तटबंदीच्या भिंती ठेंगण्याच
कारागृहाच्या तटाची १५ फुटांची उंची कमी असून, ती वाढविणे गरजेचे आहे, यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हा कारागृह लहान प्रकारातील असून येथे २०० बंदीवानांची राहण्याची क्षमता असताना, कारागृहात आज मितीस याठिकाणी ४५० पेक्षा जास्त बंदिवान ठेवण्यात आले आहेत, जेल मॅन्युअलच्या नव्या अध्यादेशानुसार ६ बंदीवाना मागे एक सुरक्षारक्षक असणे अपेक्षित आहे, त्या मानाने केवळ ४० कर्मचाऱ्यांवर बंदिवानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, गार्ड ड्यूटी व्यतिरिक्त रुग्णालयाची कामे, टपाल ने-आण, न्यायालयात ये-जा आणि रोजच्या साप्ताहिक रजा याचा विचार करता परिस्थिती आणखी विदारक होते, याचा येथील स्थानिक यंत्रणेवर सुरक्षिततेच्यादृष्टीने ताण पडत असल्याचे त्यांनी कबूल केले. जिल्हा कारागृहात शिपायांची कमतरता भासत असून, राज्यात इतर ठिकाणी तयार झालेल्या नवीन कारागृहांप्रमाणे याठिकाणी बदल करण्याची गरज आहे. 

या सर्व बाबींचा कामकाजावर प्रभाव पडून जळगाव कारागृह या ना त्या कारणाने अशा समस्यांमुळे चर्चेत असते, असेही त्यांनी मान्य केले.

कर्मचारी संख्या कमी
बंदीवानांची अमर्याद संख्या लक्षात घेता कारागृहात ८० शिपायांची आजच गरज आहे. प्रत्यक्षात ते काम केवळ ४० शिपायांकडून केले जाते. अशा परिस्थितीत कैद्यांवर लक्ष ठेवणे मोठे आव्हानात्मक असल्याचे ते म्हणाले. मध्य विभागात १४ कारागृहात १०० पदांवर भरती होणार आहेत. त्यांचे वाटप अभ्यासून जळगाव कारागृहासाठी पदे भरण्यावर भर दिला जाईल, अशी त्यांनी माहिती दिली. कैद्यांची संख्या वाढल्याने सुरक्षितता ही गरज झाली आहे. यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न तसेच पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com