जैताणे ग्रामपंचायतीला आली दिवंगत सरपंचांची आठवण!

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

दूरदृष्टीचे राजकारणी, दिवंगत सरपंच वेडू अण्णा महाजन हे धुळे जिल्हा व साक्री तालुक्यासह माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेच्या सामाजिक व राजकीय इतिहासात अजरामर राहतील. त्यांना येथील जनता कदापि विसरू शकणार नाही. असा नेता पुन्हा होणे शक्य नाही.
- ईश्वर कृष्णा न्याहळदे, नवनिर्वाचित सरपंच, जैताणे ता. साक्री.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार, गटनेते संजय खैरनार, नानाभाऊ पगारे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदींसह सदस्य व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्मृतिदिन साजरा झाला.

सलग तीन पंचवार्षिक अर्थात 5 जुलै 1972 ते 10 ऑक्टोबर 1983 या अकरा वर्षे 3 महिने 4 दिवसाच्या सरपंचपदाच्या कालखंडात त्यांनी जैताणेचे नाव खऱ्या अर्थाने खान्देशात उज्वल केले. दरम्यान पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते निवडून आले होते. एक धडाकेबाज राजकारणी व विकासपुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. लाल बावटा ते काँग्रेस असा राजकीय प्रवास त्यांनी केला. दिनांक 4 मार्च 1934 ला जन्मलेल्या वेडू अण्णांचा सरपंचपदी असतानाच 10 ऑक्टोबर 1983 रोजी अवघ्या 49 वर्षे, 7 महिने, 6 दिवसाच्या वयातच अकाली मृत्यू झाला.

दिवंगत सरपंच वेडू नागो महाजन यांनी 1952 मध्ये राजकारणात प्रवेश केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग, 1959 साली भूमिहीन चळवळीत भाग, यात दीड महिना कारावास भोगला. 1967 साली जमीन ज्योत सत्याग्रहात भाग, 1977 साली इंदिराजींच्या अटकेविरुद्ध जेलभरो आंदोलन केले, त्यावेळी सात दिवस कारावास भोगला. 1972 ते 1983 पर्यंत जैताणेचे सरपंचपद भूषविले. 1970 ते 1972 पर्यंत साक्री पंचायत समितीचे सदस्य होते. तर 1977 ते 1983 पर्यंत धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. माळी समाजाचे साक्री तालुकाध्यक्ष होते.

सामान्य जनतेसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात ते सतत आघाडीवर होते. हरीजनांना न्याय मिळवून देण्यासाठीही अनेक लढ्यात ते आघाडीवर होते. त्यांनी अभ्यासू वृत्तीने अनेक प्रश्नांनी जिल्हा परिषद गाजविली. सामान्य माणसाच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारा व भ्रष्टाचाराच्या विरोधात तुटून पडणारा अशी अण्णांची प्रतिमा होती. कोणताही अन्याय ते सहन करीत नसत.

बेरोजगारांना रोजगार, बेघरांना घरे, हरिजन वस्तीत विजेची सोय, 200 वृक्षांची लागवड, ग्रामपंचायतीत फोनची सोय, बालमंदिर, समाजमंदिर, जिल्हा परिषदेची शाळा, सेंट्रल बँकेची शाखा, महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केटसह रस्ते, वीज, पाणी आदी पायाभूत सुविधांची निर्मिती केली. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवून आर्थिक स्थिती मजबूत केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. जैताणे गावाला प्रगतीच्या यशोशिखरावर नेत असताना अचानक काळाने क्रूर घाव घालून अशा नामवंत, विचारवंत, धडाडीच्या कार्यकर्त्याला 10 ऑक्टोबर 1983 साली आपल्यातून हिरावून नेल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.

त्यांच्या पावन स्मृतींना उजाळा देण्यासाठी विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, उपसरपंच नवल खैरनार व सदस्यांनी दरवर्षी 10 ऑक्टोबरला जैताणे ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत सरपंच महाजन यांना ग्रामपंचायतीतर्फे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामस्थ भारत मोरे, प्रशांत धनगर, कर्मचारी योगेश बोरसे, प्रदीप भदाणे, अनिल बागुल, काळू पगारे, भगवान जगदाळे आदी उपस्थित होते. दरम्यान दिवंगत सरपंच कै.वेडू नागो महाजन यांचा 35 वर्षानंतर प्रथमच ग्रामपंचायतीतर्फे स्मृतिदिन साजरा केल्याबद्दल सरपंच न्याहळदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaitane Gram Panchayat remembers the departed sarpanch