जैताणेत ज्या तारखेला 'पदभार' त्याच तारखेला 'राजीनामा.!'

भगवान जगदाळे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

विशेष म्हणजे तीन वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर त्याच तारखेला त्यांनी राजीनामाही दिला. तत्पूर्वी उपसरपंच आबा भलकारे यांनीही सरपंच संजय खैरनार यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खैरनार यांनी मंगळवारी (ता. 28) पंचायत समिती सभापतींकडे आपल्या सरपंचपदाचा राजीनामा सोपविला. दि. 28 ऑगस्ट 2015 ला त्यांनी पदभार स्वीकारला होता.

विशेष म्हणजे तीन वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर त्याच तारखेला त्यांनी राजीनामाही दिला. तत्पूर्वी उपसरपंच आबा भलकारे यांनीही सरपंच संजय खैरनार यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला आहे.

त्यासंदर्भात नुकतेच 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सरपंच संजय खैरनार यांनी सोमवारी (ता. 27) तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात गटनेत्यांची बैठक बोलावली. त्यात गटनेते भगवान भलकारे, ईश्वर पेंढारे, मोतीलाल मोरे, नानाभाऊ पगारे व सरपंच संजय खैरनार आदींचा समावेश होता. बैठकीत झालेल्या वाटाघाटींनुसार दोन्ही राजीनामे मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे यांची सरपंचपदी वर्णी लागणार असून उपसरपंचपदी नवल खैरनार यांची वर्णी लागणार आहे. दोन्ही राजीनाम्यांवर माजी उपसरपंच नानाभाऊ पगारे व ग्रामपंचायत सदस्य शानाभाऊ बच्छाव यांच्या साक्षीदार म्हणून सह्या आहेत. 

ईश्वर न्याहळदे व नवल खैरनार यांना अनुक्रमे सरपंच-उपसरपंचपदाची 'पहिली टर्म' देण्याचे सामंजस्याने ठरले असून उर्वरित उमेदवारांनाही ठराविक कालावधीसाठी सरपंच-उपसरपंचपदी संधी देण्यात येणार असल्याची माहिती गटनेते व सरपंच खैरनार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. "आमच्या सर्व सदस्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दुफळी नसून आमची एकी हीच विरोधकांना चपराक आहे," अशी प्रतिक्रिया धनगर समाजाचे गटनेते भगवान भलकारे यांनी दिली.

मंगळवारी (ता. 28) सायंकाळी पाचच्या सुमारास मावळते सरपंच संजय खैरनार यांनी आपला राजीनामा साक्री पंचायत समितीच्या सभापतींकडे सुपूर्द केला. यावेळी गटनेते भगवान भलकारे, ईश्वर पेंढारे, मोतीलाल मोरे, माजी उपसरपंच नानाभाऊ पगारे, मावळते उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, शानाभाऊ बच्छाव, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड आदी उपस्थित होते. भावी सरपंच, उपसरपंच निवडीबाबत गावकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोचली असून आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Jaitanes sarpanch resigned a same date of joining