बेंडाळे महाविद्यालयासमोर दोन शोरुमसह क्‍लिनिक फोडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

जळगाव - पोलिस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या मिनिटाच्या अंतरावर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चोरट्याने एकामागून एक अशा दोन शोरूमसह डॉक्‍टरांचे क्‍लिनिक फोडल्याची घटना घडली. दुकाने व शोरुमची सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रेकी केल्यानंतर रात्रीतून चोरी केल्याचा पोलिसांचा संशय असून घटनास्थळावरील "सीसीटीव्ही' फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे.

जळगाव - पोलिस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या मिनिटाच्या अंतरावर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चोरट्याने एकामागून एक अशा दोन शोरूमसह डॉक्‍टरांचे क्‍लिनिक फोडल्याची घटना घडली. दुकाने व शोरुमची सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रेकी केल्यानंतर रात्रीतून चोरी केल्याचा पोलिसांचा संशय असून घटनास्थळावरील "सीसीटीव्ही' फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर ला. ना. शाळेलगत बेंडाळे महाविद्यालयासमोरील रसाळ चेंबर, जगताप कॉम्प्लेक्‍समध्ये एकट्या चोरट्याने निर्भयपणे एकामागून एक तीन दुकाने फोडली. रात्री अवघ्या साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्याने हिंमत केल्याने व्यापाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोंडाला रुमाल बांधून, हातात कटावणी, स्क्रू ड्रायव्हर घेत चोरटा अगोदर डॉ. गोविंद मंत्री यांच्या मंत्री फेशियल ऍण्ड सर्जरी सेंटरमध्ये शिरला. येथे साधारण वीस मिनिटांत डॉक्‍टरांची केबिन, रिसेप्शन, सर्जरीरुम अशा चारही खोल्यांत शोधमोहीम राबवली. दालनाचे ड्रॉवर तोडूनही काही हाती आले नाही. अखेर चोरट्याने काढता पाय घेत शेजारीच जयेश सुभाष जैन यांचे मालकीचे "पेहनावा' या महिला व लहान मुलांच्या रेडिमेड शोरुमच्या शटरचे लॉक तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलूप तोडणे अशक्‍य झाल्याने त्याला तसेच बाहेर पडावे लागले.

जॉकी शोरुमसह गोदामात धुडगूस
चोरट्याने ला. ना. शाळेच्या पश्‍चिमेकडील प्रवेशद्वाराकडून येत विनीत महेंद्र भन्साळी यांच्या मालकीच्या जॉकी शोरुमच्या तळघरातील गोदामाची लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. खाली आल्यावर शोधाशोध करीत त्याने टेलरिंग वर्कशॉपमध्ये जाऊन तेथून टोचा आणि कात्री उचलून आणली. वर शोरूममध्ये शिरण्यासाठी काचेचे दार लॉक असल्याने ते उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र उघडता न आल्याने काचेचा दरवाजा पूर्णत: फोडून चोरटा शोरूममध्ये शिरला. मालकाच्या कॅशटेबलचे ड्रॉवर तोडून त्यातून दहा ते पंधरा हजारांची रोकड लंपास केली.

चोरी करतानाही बाहेर नजर
चोरटा ठीक सव्वाअकरा ते दोन वाजेपर्यंत सीसीटीव्हीत दिसत आहे. अर्थात तो साडेतीन तासापेक्षा अधिक काळ या परिसरात होता. डॉक्‍टर मंत्री यांच्या क्‍लिनिकमध्ये 22 मिनिटे असताना काचेच्या खिडक्‍यांमधून चौकातील हालचाली दोन वेळेस त्याने बघितल्या. साधारण पावणेसहा फूट उंचीच्या या चोरट्याने जॉकीचे शोरूमचे काचेचे दार तोडून आत प्रवेश केला. फारशी रोकड मिळत नाही म्हणून त्याने महागडे फॅशनेबल कपडे ट्रायल रूममध्ये जाऊन घालून बघितले. काऊंटरमधूनच ऐटीत कॅरिबॅग काढून त्यात दहा ते बारा हजारांचे कपडे पॅक करून पोबारा केला आहे.

सायंकाळी दोघांची "रेकी'
पेहनावा शोरूममध्ये सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती वर्गणी मागण्यासाठी आले होते. त्यांच्या हातात उत्तर प्रदेशातील एका धार्मिक स्थळाचे प्रसिद्धिपत्रक होते. दान देण्यासाठी त्यांनी जयेश जैन यांच्याकडे मागणी केली. धार्मिक वेशातील एक बोलत होता तेव्हा त्यासोबतचा दुसरा व्यक्ती शोरुममधील सीसीटीव्ही कॅमेरांची पडताळणी करीत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे, रात्री आलेला चोरटा व त्याच्या शरीराची ठेवण सारखीच असल्याचे जाणवल्याने त्या दोघांवरच शोरूम चालकाचा संशय बळावल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील गुन्हेशाखेच्या पथकाने घटना माहिती झाल्यावर अकरा वाजताच घटनास्थळाला भेट देत पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

Web Title: jalgan news theft in jalgav