जळगाव शहरात दिवसभर बरसल्‍या ‘जल’धारा...!

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

श्रावणात लागणाऱ्या पावसाची झडी गेल्या दहा- बारा दिवसांपासून अनुभवण्यास मिळत आहे. श्रावण महिन्याला सुरवात होण्यापूर्वीच झडीचा अनुभव येत असून, रोज रिमझिम पावसाचे आगमन होत आहे. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. मध्येच जोरदार पाऊस येऊन दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच राहिला.

जळगाव - श्रावणात लागणाऱ्या पावसाची झडी गेल्या दहा- बारा दिवसांपासून अनुभवण्यास मिळत आहे. श्रावण महिन्याला सुरवात होण्यापूर्वीच झडीचा अनुभव येत असून, रोज रिमझिम पावसाचे आगमन होत आहे. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. मध्येच जोरदार पाऊस येऊन दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच राहिला.

जळगावकरांनी आज दिवसभर रिमझिम व जोरदार पावसाचा अनुभव घेतला. सकाळपासून पावसाचे वातावरण होते. पावसाने थोडा गारवा मिळाला असला, तरी शनिवारी (ता. ३) दुपारी थोडा वेळ पडलेल्या सूर्यप्रकाशानंतर लगेच गरम होऊ लागले होते; परंतु शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्रभर भीजपाऊस सुरूच होता. आज सकाळपासून हा भीजपाऊस सुरूच राहून दहा- पंधरा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रिमझिम पावसाच्या सरींना सुरवात होत असे. रात्री उशिरापर्यंत संततधार पाऊस थोड्या- थोड्या वेळाने सुरू होता. संततधारेमुळे रस्ते ओले होऊन ठिकठिकाणी डबकीही साचली होती. जिल्ह्यातील शेतकरी मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

रस्त्यांवर चिखल अन्‌ खड्डे
रिमझिम पाऊस सुरूच असल्याने सर्वच रस्त्यांवर चिखल झालेला पाहण्यास मिळत आहे. शहरातील कॉलन्यांमध्ये ‘अमृत’मुळे खोदलेल्या रस्त्यांवर चिखल तर झालाच आहे. पण, मुख्य डांबरी रस्त्यांवरही चिखल होऊन ठिकठिकाणी तो उखडला गेला आहे. शिवाय, रिमझिम पावसामुळे रस्त्यांवरील डांबर निघून खड्डे पडले आहेत. महामार्गावरही हीच परिस्थिती असून, महामार्गावर बहुतांश ठिकाणी डांबर निघून गेल्याने खड्डे पडले आहेत.

रेनकोट, छत्र्यांची खरेदी 
संततधारेने बचावाचे साधन नसल्याने चिंब झालेल्यांकडून रेनकोट, छत्र्यांची खरेदी करण्यात येत आहे. शिवाय आकर्षक, रंगबिरंगी प्लॅस्टिक टोप्या, रेनकोट बाजारात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgaon City Rain Water