एकतर्फी प्रेमातून हे काय विद्यार्थ्यांने

एकतर्फी प्रेमातून हे काय विद्यार्थ्यांने

जळगाव : एकतर्फी प्रेमातून तरुणीला "प्रपोज' केल्यानंतर तिने नकार देताच संतप्त झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन तरुणाने वर्गातच भिंतीवर डोके आपटून घेतले.. हा धक्कादायक प्रकार आज दुपारच्या सुमारास मू. जे. महाविद्यालयात घडला. हा प्रकार पाहून भेदरलेली तरुणी प्राचार्यांच्या दालनाकडे पळाली, पाठोपाठ तोदेखील पळाला व दालनाबाहेर पडला. तरुणाला जखमी अवस्थेत प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयात एम. एस्सी. प्रथम वर्षाला असलेला मयूर ऊर्फ उमेश संजय जाधव (वय 25) या विद्यार्थ्याला दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यास रिक्षाने जिल्हा रुग्णालयात बेशुद्धावस्थेत आणले. डॉक्‍टरांनी त्याची तपासणी करून रक्तदाब वाढल्याने उपचाराला सुरवात केली. 

असा घडला प्रकार 
मयूरला जिल्हा रुग्णालयात घेऊन येणारे शिक्षक आणि प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरची एम.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीसोबत मैत्री आहे. मैत्रीतून मयूरला प्रेम जडले व तसा प्रस्ताव त्याने दिल्यानंतर मुलीने स्पष्ट शब्दात अनेकवेळा नकार दिला. लेखी परीक्षेचा पेपर सुटल्यावर मयूरने महाविद्यालयातच त्या मुलीला गाठून पुन्हा त्याच विषयावर विचारणा केली. मात्र, आज पुन्हा तिने नकार दिल्याने मयूरने संतापात भिंतीवर स्वत:चे डोके आपटून घेतले. 

तरुणीची प्राचार्यांकडे धाव 
घडल्या प्रकाराने भेदरलेल्या विद्यार्थिनीने प्राचार्य उदय कुळकर्णी यांच्या केबिनच्या दिशेने धाव घेतली. तिच्यामागे मयूरही जोरात धावत सुटला. मात्र, ती मुलगी थेट दालनात शिरली. बाहेर मयूरने परत हात आपटून घेतल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. विद्यार्थी व शिक्षकांनी तत्काळ उचलून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

त्याला रक्तदाबाचा त्रास 
बेशुद्धावस्थेत मयूरला दाखल केल्यावर त्याच्या कुटुंबीयांचा मोबाईल क्रमांक शिक्षकांना माहिती नव्हता. मात्र, त्याचे वडील पोलिस दलात असल्याचे सांगितल्यावर त्याच्या वडिलांचा शोध घेत त्यांना फोन करण्यात आल्यावर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मयूरला उच्च रक्तदाबाचा त्रास असून, यापूर्वीही तो एकदा बेशुद्ध पडला होता. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे कुटुंबीयांनी माहिती देताना सांगितले. 


.. तो धावला मदतीला 
मयूरला यापूर्वीही उच्च रक्तदाबाचा असाच त्रास झाला होता, आज त्रास झाल्यावर तो त्या मुलीला मदतीसाठी थांबवत असताना तिचा गैरसमज झाला असावा. 
- संजय जाधव (मयूरचे वडील) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com