उन्हापासून बचावासाठी "सननेट' अन्‌ गार पाणी 

उन्हापासून बचावासाठी "सननेट' अन्‌ गार पाणी 

जळगाव - मार्च- एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकू लागल्याने तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलेले असताना, सर्वसामान्यांसाठी उष्म्याच्या त्रासात घोटभर पाणी, सावलीचा आसरा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यालयाच्या वऱ्हांड्यात "सननेट' लावण्यासह पिण्यासाठी जारचे थंड पाणी, ठिकठिकाणी निसर्गरम्य चित्रे लावून या शासकीय कार्यालयाचा "लुक'च बदलण्यात आला आहे. 

शासकीय कार्यालय म्हटले, की अनेक अडचणी तेथे असतात. मात्र, जिल्हाधिकारी म्हणून किशोरराजे निंबाळकर यांनी जेव्हापासून जिल्ह्याचा कारभार हाती घेतला आहे, तेव्हापासून कार्यालयात अनेक बदल जाणवत आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाचा त्रास जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांना होऊ नये यासाठी ऊन येणाऱ्या बाजूने "सननेट' लावून सावली कशी राहील, असा प्रयत्न करण्यात आला आहे. 

कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकांना पाणी लवकर मिळत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला पाणी मिळाले पाहिजे, या हेतूने इमारतीच्या विविध विभागांबाहेर पाण्याचे जार बाकावर ठेवले आहेत. ज्याठिकाणी जाऊन नागरिक पाणी पिऊ शकतील, अशी व्यवस्था आहे. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील बंद असलेले पाण्याचे वॉटरकूलर सुरू करण्यात आले आहेत. 

"लुक' बदलला 
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर, पुरवठा शाखेच्या बाहेर "सननेट' लावल्याने उन्हाची तीव्रता कार्यालयात आलेल्यांना जाणवत नाही. सोबतच "सननेट'वर ऊन पडल्याने आतील भाग हिरवागार दिसतो. यामुळे उत्साहवर्धक वातावरणनिर्मिती झाली आहे. 

कर्मचाऱ्यांना ओळखपत्र 
गेल्या दहा- बारा वर्षांत जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने त्याकडे असलेले ओळखपत्र घातलेले नव्हते. मात्र, जिल्हाधिकारी निंबाळकर आल्यानंतर शिस्तीचा भाग म्हणून त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावण्यास सांगितले. आता बहुतांश सर्वच अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र घातलेले दिसून येतात. यामुळे नागरिकांना नेमका अधिकारी कोण आहे, तो जागेवर आहे की किंवा याची लागलीच ओळख पटते. कुळकायदा शाखेतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलसमोरच विविध निसर्गरम्य परिसराचे चित्र लावले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा कामातील उत्साह वाढू लागला आहे. 

शिस्तीचा भाग म्हणून ओळखपत्र लावण्यास सांगितले आहे. सर्वसामान्यांच्या कामांसह महसूल विभागाशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह असला पाहिजे. तो वाढविण्यासाठी आल्हाददायक वाटावी अशी निसर्गचित्रे कार्यालयात ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. 
- किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com