पुण्यातील हमाल...चित्रपटात करतोय धमाल 

रईस शेख
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

जळगाव : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, धान्याची पोती उचलणाऱ्या हमाल तरुणाने चक्क चित्रपटसृष्टीपर्यंत मजल गाठत एकापाठोपाठ तीन मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. मुळातच शिवभक्त असलेल्या संदीप कुराडे या अल्पशिक्षित तरुणाने घेतलेली गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. नाट्यक्षेत्राची आवड, मेहनत घेण्याची तयारी आणि संयमाच्या जोरावर हमाल संदीपने कमाल करून दाखवली असून, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित दोन चित्रपटांत त्याने काम केले. आणखी एक ऐतिहासिक चित्रपटासाठी तो तयारी करीत आहे. 

जळगाव : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, धान्याची पोती उचलणाऱ्या हमाल तरुणाने चक्क चित्रपटसृष्टीपर्यंत मजल गाठत एकापाठोपाठ तीन मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. मुळातच शिवभक्त असलेल्या संदीप कुराडे या अल्पशिक्षित तरुणाने घेतलेली गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. नाट्यक्षेत्राची आवड, मेहनत घेण्याची तयारी आणि संयमाच्या जोरावर हमाल संदीपने कमाल करून दाखवली असून, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित दोन चित्रपटांत त्याने काम केले. आणखी एक ऐतिहासिक चित्रपटासाठी तो तयारी करीत आहे. 
नुकताच प्रदर्शित झालेला "फत्तेशिकस्त' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो जळगावात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात डीवायएसपी असलेले त्याचे काका सुनील कुराडे यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची भेट घेत त्याने पोलिस दलासोबत खानदेश सेंट्रलमध्ये चित्रपट बघितला. यावेळी "रिल' आणि "रियल लाइफ'चा खडतर प्रवास त्याने "सकाळ'शी बोलताना उलगडला. 

"रियल' हमालीतील नायक 
नव्वदच्या दशकात पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित आणि लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला "हमाल दे धमाल' हा मराठी चित्रपट खूप गाजला. हमाली करणारा तरुण मेहनतीच्या जोरावर चित्रपट कलावंत म्हणून नावारूपाला येतो. असे थोडक्‍यात कथानक असलेल्या या चित्रपटातील कथा काल्पनिक आणि पात्र ही काल्पनिक आहे. मात्र, मूळ आयुष्यातच "हमाल' असणाऱ्या पुण्यातील संदीप कुराडे याने मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्यक्षात "धमाल' करून दाखवली आहे. 

नक्‍की पहा > त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले ह्या मुख्यमंत्र्यांनी थांबविले

मित्राने केले प्रेरीत 
चोवीस वर्षीय संदीप ज्ञानदेव कुराडे पुण्यातील बाजार समितीत हमाली करतो. कुटुंबात आई जनाबाई, वडील ज्ञानदेव कोळी, लहान भाऊ प्रदीप असे चौकोनी कुटुंब. मात्र, परिस्थिती हलाखीची. आई-वडील दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतात. त्यांना हातभार लावावा म्हणून लहानपणीच आठवीपासून शिक्षण सोडून कामासाठी बाहेर पडावे लागले. किराणा दुकानात पुड्या बांधण्यापासून सुरवात झाली. बाजार समितीत गेल्या सहा वर्षांपासून अधिकृतरीत्या माथाडी युनियनचा सदस्य असून, हमाली व्यवसाय करतो. नाट्यक्षेत्राची आवड असल्याने त्याचा मित्र प्रेम नरसाळे याने त्याला प्रेरित केले. काम केल्याशिवाय चूल पेटणार नाही म्हणून नाटकासाठी रोजंदारी बुडवून काम केल्यावर उधारीने पैसे आणून तो आईच्या हातात टेकवत होता. चंदेरी पडद्यावर चमकण्याचे स्वप्न पाहत असतानाच त्याने चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सुरवात केली. 

Image may contain: 1 person, sitting, shoes and outdoor

क्‍लिक करा > खाकिने घेतले छत्रपतींच्या युद्धनीतीचे धडे 

चारशे ऑडीशननंतर संधी 
गेल्या काही वर्षांत तब्बल 400 ऑडिशन झाल्यावर त्याला "अरुणा-670' चित्रपटात पहिली संधी मिळाली. मात्र, चित्रपटच प्रदर्शित झाला नाही. नंतर "आयटमगिरी' या चित्रपटात टपोरी तरुणाचे पात्र त्याने केले. नंतर "जामवंती'साठी काम केले. छोटी-छोटी कामे करीत असताना संदीप दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित "फर्जंद' चित्रपटात रांगडा मावळा म्हणून छोटी भूमिका केली. त्यानंतर तो नुकताच प्रदर्शित झालेला "फत्तेशिकस्त' या चित्रपटातून "खिरोजी'च्या रूपात झळकला. आगामी चित्रपटही छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असून त्यासाठी तो पहाटे चारपासून व्यायामात स्वत:ला झोकून देत तयारी करीत आहे. 

Image may contain: 1 person, standing

"शिवभक्ती' नसांनसात 
कुटुंबातून चित्रपटसृष्टीत कोणीही नाही. शिक्षण जेमतेम, पोट भरण्याचे वांदे असताना संदीपने चित्रपटसृष्टीत काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगत आयुष्याची वाटचाल सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वचनांवर आयुष्याची ठेवण बसवलेल्या संदीपला सुपारीचेही व्यसन नाही. जे मिळेल ते उत्पन्न आईच्या हातावर ठेवतो. कुटुंबातून चित्रपटात कामासाठी प्रचंड विरोध असताना काका सुनील कुराडे यांनी प्रोत्साहित केले. त्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासारखे शिवभक्त गुरू भेटल्याने आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे संदीप सांगतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon fatesikast marathi film pune bajar samiti cooly