औरंगाबाद महामार्ग आठ दिवसांत वाहतूक योग्य करणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद महामार्ग आठ दिवसांत वाहतूक योग्य करणार 

औरंगाबाद महामार्ग आठ दिवसांत वाहतूक योग्य करणार 

जळगाव : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरींच्या दणक्‍यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग युनिटचे अधिकारी दोन दिवसांपासून जळगाव- औरंगाबादच्या "वाट' लागलेल्या रस्त्याच्या साइटवर पोचले. पावसाची विश्रांती कायम राहिली तर आठ दिवसांत हा रस्ता "मोटरेबल' म्हणजे, वाहतुकीसाठी किमान योग्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यासंबंधी उपकंत्राटदारास सूचनाही दिल्या असून, चौपदरीकरणाचे काम कसे गतिमान करता येईल, याबाबतही नियोजन सुरू झाले आहे. 
सध्या प्रसार माध्यमांसह समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) चर्चेचा विषय बनलेल्या जळगाव- औरंगाबाद रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जनमानसांत कमालीची नाराजी पसरली आहे. जवळपास 150 किलोमीटरचा हा रस्ता महामार्ग विभागाचे चुकीचे नियोजन, कंत्राटदाराच्या मनमानीमुळे शेतरस्त्यापेक्षाही खराब झाला आहे. संपूर्ण रस्त्यात दोन्ही बाजूंनी मुरूम, माती आणि पावसामुळे चिखल, डबके साचले आहे. दुचाकीच नव्हे तर आता चारचाकी वाहने, ट्रक, बसची वाहतूकही जिकरीची झाली असून, वाहनधारकांसह प्रवाशांचा जीवही धोक्‍यात घालून यावरील वाहतूक सुरू आहे. 

गडकरींकडून दखल 
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या अजिंठ्यावरुन जाणाऱ्या या मार्गाच्या दुरवस्थेबाबत सातत्याने माध्यमांचा पाठपुरावा, कोर्टाची सुमोटो याचिका दाखल असताना त्याचे काम मार्गी लागत नसल्याने केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरींनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आठवडाभरात या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश देत, कठोर कारवाईचा इशारा दिला. गडकरींच्या या दणक्‍याने दोन दिवस अधिकारी थेट साइटवर पोचले आणि कामासंबंधी नियोजन सुरू केले. 

उपकंत्राटदारास सूचना 
महामार्ग मंडळाचे कार्यकारी अभियंता पी. एस. औटी यांनी रस्त्याच्या साइटवर भेट दिली. दोन दिवस सलग दौरा करून हा रस्ता किमान वाहतुकीसाठी योग्य करावा, अशा सूचना उपकंत्राटदारास दिल्या. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम घेणारा मूळ मक्तेदार काम अर्धवट सोडून निघून गेल्याने हे काम आता उपकंत्राटदारांकडून करून घेणे महामार्ग विभागासमोर आव्हान आहे. त्यादृष्टीनेही श्री. औटी यांनी सूचना दिल्या. 

चौपदरीकरणाचे "मॉनिटरिंग' 
रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसह रखडलेले चौपदरीकरणाचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने महामार्ग विभागाने नियोजन सुरू केले आहे. रस्त्याची एक बाजू खुली ठेवत दुसऱ्या बाजूने कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण अशा टप्प्यात काम करण्यात येईल. त्यावर प्रत्यक्ष महामार्ग विभाग "मॉनिटरिंग' करेल, असेही सूत्रांनी सांगितले. 

कोट... 
मूळ मक्तेदार काम सोडून गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता हे काम उपकंत्राटदारांच्या माध्यमातून करून घेण्यात येईल. आठ- दहा दिवसांत पावसाने कृपा केलीच तर हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात येईल. 
- पी. एस. औटी 
कार्यकारी अभियंता, महामार्ग सर्कल, औरंगाबाद 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news aurangabad highway 8 day repering