गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ; एकूण 63 टक्के

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

आवर्तनामुळे झालेली घट निघाली भरून; 63 टक्के साठा

पिलखोड (ता. चाळीसगाव)  :  गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील साठा 61 वरून 63 टक्क्यांवर गेला आहे. पाचोरा तालुक्यासाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाच्या पाण्याची भर भरून निघाली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने ही वाढ होत आहे. चणकापूर धरणातून 593 क्यूसेक आणि पुनदमधून 332 क्यूसेक पाण्याचा विसर्ग काल(ता. 14) सुरू होता. ही आवक जरी अल्प प्रमाणात असली, तरी या पाण्यामुळे साठ्यात हळुहळू दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या आवक अत्यल्प सुरू आहे. धरणाचा एकूण साठा 14 हजार 656 दशलक्ष घनफुट असून 11 हजार 656 दशलक्ष घनफुट एवढा जिवंत साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरणाचा साठा 63 टक्के झाला आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

आवर्तनाची घट भरून निघाली...
पाचोरा व भडगाव शहरात काही दिवसांपूर्वी पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या मागणीवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये धरणातून आवर्तन सोडले होते. 900 दशलक्ष घनफुट एवढ्या मागणीचे हे आवर्तन होते. ज्यावेळी धरणातून पाणी सोडले, त्यावेळी धरणात 63 टक्के साठा होता. याशिवाय वरूनही आवक सुरूच होती. वरच्या आवकमुळे धरणाचा साठा होता तसाच राहिला. जे पाणी वरून आले ते तसेच वाहून गेले. मात्र नंतर आवक बंद झाल्याने धरणातील दोन टक्के पाणी कमी झाले होते. आता झालेली घट पुन्हा भरून निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, धरण भरण्याच्या दृष्टीने आणखी दमदार पावसाची गरज आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: jalgaon marathi news chalisgaon girna dam water storage