हल्लेखोर बिबट्या अजूनही मोकाटच; वासराचा पाडला फडशा

दीपक कच्छवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

दुसराच बिबट्या कैद
पाटणादेवी अभयारण्यलगत असलेल्या पिंपरखेडे (ता. चाळीसगाव) येथील परिसरात वनविभागाच्या पिंजर्‍यात त्याच भागात फिरणारा बिबटय़ा अडकला ज्याच्या शेतात हा पिंजरा ठेवला होता. श्री मुलमुले यांच्या गुराववर यापुर्वी बिबट्याने हल्ला केला होता. या शेतात जवळ अभयारण्य असल्यामुळे रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या पिंजर्‍यात अडकला. वनमंत्र्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्या दबाखालीच बिबट्याला पकडल्याची चर्चा वनविभागात सुरू आहे. बिबट्याला पकडल्याचे वनविभागाकडुन सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष हल्ले करणारा बिबट्या पकडण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : काल (ता. 2) वनविभागाने पाटणादेवी अभयारण्यालगत असलेल्या पिंपरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शिवारात बिबट्याला जेरबंद केले असले तरी, हल्लेखोर बिबट्या अजूनही मोकाटच आहे. काल रात्रीच्या सुमारास वरखेडे येथे वासराचा फडशा पाडला. त्यामुळे हल्ले करणारा बिबट्या आद्यापही मोकाट असल्याचे दिसून येत आहे. या भागात बिबट्याची दहशत कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बिबट्याने आपला पशुसंहार सुरू केला आहे. नर व पशुसंहार करणाऱ्या बिबट्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडकुंडीला आणले आहे. वरखेडे गावापासून दिड किलोमीटर अंतरावर असलेल्य माळरानावर शेती असलेल्या सुरसिंग हारसिंग पवार यांची गुरे त्यांनी नेहमीप्रमाणे शेतातच बांधलेली होती. सुरसिंग पवार व त्यांचा पुतण्या शरद हे नेहमी प्रमाणे दुध काढण्यासाठी आज सकाळी गेले असता बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे दिसुन आले. हा प्रकार पाहताच त्यानी गावात येवुन त्यांचे भाऊ कोमलसिंग पवार यांनी या घटनेची माहिती वनविभागाला कळविली.

वरखेडेत लावला पिंजरा
वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आल्यामुळे वनविभागाने आज सायंकाळी सहाला सुरसिंग पवार यांच्या शेतात पिंजरा लावल्याचे वनपाल प्रकाश पाटील यांनी 'सकाळ' ला सांगितले. बिबट्याने या हल्ल्यात वासराचे डोके सोडुन मानेपासुन ते पोटापर्यतचा भाग खाल्लेला आहे. त्यामुळे हा हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे सिध्द झाले आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा आशी मागणी होत आहे.

बिबट्याचे हल्ले सरूच
पिंपळवाड म्हाळसा, उंबरखेडे, पिलखोड, वरखेडे, दरेगाव, अलवाडी, उपखेड या भागात बिबट्याने तीन जणांना ठार केले असून अनेकांच्या गुरांचा फडशा पाडला आहे. बिबट्याचे हाल्ले या भागात मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे शेतकरी व पशुपालकामध्ये भिती पसरली आहे. वनविभागाने मांजरी भागात सहा पिंजरे लावले आहेत. ट्रॅप कॅमेरे देखील बसविले आहेत. वनविभागाकडे सध्या शुटर उपलब्ध असला तरी बिबट्याचे हाल्ले सुरूच आहेत.

शेतकरी वनमंत्र्याची भेट घेणार
या भागात बिबट्याकडन सततच्या होणार्‍या हाल्यामुळे शेतात शेतमजुर धजावत नाहीत. वनविभागाने पिंजरे ठेवूनही बिबट्या येत नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत. बिबट्याचा वावर असलेल्या अभयारण्यलगत पिंजरा ठेवल्यानंतर त्यात तो अडकण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बिबट्याचा हैदोस अद्यापही सुरूच असल्याने वरखेडे येथील शेतकऱ्याचे शिष्टमंडळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार असल्याचे शेतकऱ्यांनी 'सकाळ'ला सांगितले.

Web Title: jalgaon marathi news chalisgaon leopard kills another bull