जाळ्यात बिबट्या नाही, माकड अडकलं !

शिवनंदन बाविस्कर
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

दुपारच्या सुमारास उपखेड रस्त्याकडील परिसरात माकडाला पकडण्यास वन विभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पिलाखोड (ता. चाळीसगाव) : गेल्या काही महिन्यांपासून शेपूटतुट्या माकडाने येथे हैदोस घातला होता.  त्याला पडकण्यात वन विभागाला अपयश येत होते. मात्र, काल (ता. 7) वन विभागाने पाचोरा येथील वन्यजीव प्रेमींच्या मदतीने त्याला जेरबंद केले.

परिसरात जसा बिबट्याने हैदोस घातला आहे. तसाच काहीसा हैदोस शेपूटतुट्या माकडाने देखील घातला होता. अगदीच बिबट्याप्रमाणे नर व पशुसंहार केला नसेल. पण, हा माकड ग्रामस्थांना मारहाण करायचे. यामुळे काही महिन्यांपासून येथील ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले होते. येथील बसस्थानक परिसरात हॉटेल व्यावसायिक व फळ विक्रेत्यांना तर त्याने अक्षरशः हैराण करून सोडले होते. दीड महिन्यांपूर्वी वन विभागाच्या कर्मचार्यांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न देखील केला होता. मात्र, त्यावेळी माकड त्यांच्या जाळ्यात येऊ शकले नाही. काल (ता. 7) दुपारच्या सुमारास उपखेड रस्त्याकडील परिसरात माकडाला पकडण्यास वन विभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. महिन्यापासून हैदोस घालणारा 'बिबट्या' नाही पण; वन विभागाने 'माकड' पकडला, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. याशिवाय वन विभागाचे आभार देखील मानले. दरम्यान माकडाच्या शरीरावर काही ठिकाणी जखमा असून त्यावर पशु वैद्यकीय अधिकार्याकडून उपचार केले जाणार आहेत. उपचारानंतर माकडाला वन्यजीवांच्या अधिवासात जंगलात सोडले जाणार असल्याचे वन कर्मचार्यांनी 'सकाळ'ला सांगितले.

असे पकडले माकड...
माकडाला पकडण्यासाठी वन विभागातर्फे पाचोरा येथील अतिश चांगरे, सागर पाटील व सुरज भैरु या वन्यजीवप्रेमींना पाचारण करण्यात आले होते. पिलखोड येथे वन विभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांना उपखेड रस्त्यालगत माकड असल्याचे कळाले. त्यानुसार वन कर्मचारी त्या भागात दाखल झाले. माकडापासून काही अंतरावर पिंजरा ठेवण्यात आला. पिंजऱ्यात केळी व चपाती ठेवून वन्यजीवप्रेमींनी त्याला विशिष्ट आवाज काढुन बोलावले. त्यावेळी पिंजऱ्याचा दरवाजा एका वन्यजीव प्रेमीने दोरीने लांब पकडून ठेवला. माकड जसे खाण्यासाठी पिंजऱ्यात शिरले, तोच इकडे पिंजऱ्याचा दोर तातडीने सोडण्यात आला. यामुळे माकड अवघ्या काही क्षणांतच कैद झाले. प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांच्या मार्गदर्शानानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. यावेळी वनरक्षक प्रकाश पाटील, वन कर्मचारी बाळु शितोळे, श्रीराम राजपुत, नाना सोनवणे व ग्रामस्थ  उपस्थित होते. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: jalgaon marathi news chalisgaon leopard trap gets monkey