जळगाव शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

जळगाव शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

जळगाव ः केंद्र शासनाच्या जनसामान्य विरोधी, कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यासाठी आज विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढली, शासकीय कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले. दिवसभर आंदोलन, बंद, मोर्च्याने शहरासह जिल्हा दणाणला होता. जिल्ह्यात सुमारे तीस हजारांवर शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

राजपत्रित महासंघातर्फे लक्षवेध दिन 
राज्यातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपातील मागण्या ह्या अधिकाऱ्यांच्याही जिव्हाळ्याच्या असल्यामुळे त्यांच्या मागण्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीने आज राज्यभरात लक्षवेध दिन पाळण्यात आला. अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांना निवेदन देण्यात आले.नाशिक विभागाचे विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जळगाव जिल्हा समन्वय समितीचे कोशाध्यक्ष प्रवीण पंडित, उपाध्यक्ष अनिल भोकरे, स्वाती भिरूड, शिवाजीराव भोईटे, सहचिटणीस प्रशांत पाटील, राजेश देशमुख, प्रसिद्धी प्रमुख विलास बोडके, सदस्य दीपमाला चौरे, विजय भालेराव, शरद मंडलीक, सुभाष दळवी, माणिक आहेर, अरुण धांडे, कैलास बडगुजर, दिलीप झाल्टे, शरद नारखेडे, सतीश गऱ्हाड, र. न. तडवी, सुभाष पाटील आदि अधिकारी उपस्थित होते. 1 नोव्हेंबर, 2005 पासूनची नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना राज्यात लागू करावी. वेनतत्रुटीसंबंधीचा बक्षी समितीच्या खंड-2 अहवालाची विनाविलंब अंमलबजावणी करणे. सुधारित आश्वासित प्रगती योजनेकरिता असलेली रु. 5400/- ग्रेड पे ची मर्यादा रद्द करणे. राज्यात केंद्राप्रमाणे 5 दिवसाचा आठवडा करणे. केंद्राप्रमाणेच राज्यातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे. सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदे तत्परतेने भरणे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता व अन्य भत्यांबाबत निर्णय घेणे. विभागवार चक्राकार बदली पद्धतीतून महिला अधिकाऱ्यांना वगळणे, आदी मागण्यां निवेदनात करण्यात आल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट 
जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयात दररोज गजबज असते. आज संपामुळे कर्मचारी, सहभागी अधिकाऱ्यांनी आंदोलन केले. कार्यालयात कोणी आले नाही. यामुळे सर्वच शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी रवींद्र कदम कार्यालयात होते. अधिकाऱ्यांकडे शिपाई नसल्याने होमगार्डची नेमणूक प्रत्येक अधिकाऱ्यांकडे होती. 

आयटकतर्फे मोर्चा 
महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन कॉंग्रेसच्या जळगाव शाखेतर्फे (आयटक) ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा गटप्रवर्तक, ग्रामीण विकासोन्नती अभियान, सीआरपी व एलएलसीआरपी, शालेय पोषण आहार, बचत गट कर्मचारी, रोजगार सेवक, वीज बॅंक विमा, बीएसएनएल, सेवानिवृत्ती मील व एस.टी.कामगार, बांधकाम, कामगार या संघटित असंघटित कामगारांचा, शेतकरी, शेतमजूर, कवी, साहित्यिकांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कंत्राटी कामगारांना एकवीस हजार वेतन मिळावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 57 टक्के पगार वाढ व राहणीमान भत्ता द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. अमृतराव महाजन, जे.एन.बाविस्कर, वीरेंद्र पाटील, मीना काटोले, संतोष खरे, किशोर कंडारे, ज्ञानेश्‍वर पाटील आदींनी नेतृत्व केले. 

बाजारपेठा बंद 
सकाळी भारत बंदच्या आवाहनामुळे विविध संघटनाच पदाधिकारी अनेक व्यापारी संकुलात गेले. तेथे दुकाने बंद करण्यात आली. दुपारी दोनपर्यंत अनेक व्यापारी संकुले बंद होती. ग्राहकांना बाजारपेठेत येऊन बंदमुळे परतावे लागले. दुपारनंतर दुकाने सुरू झाली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com