नवजात शिशूंसाठी "रेटीनोथेरपी' अभियानाची मुहूर्तमेढ 

नवजात शिशूंसाठी "रेटीनोथेरपी' अभियानाची मुहूर्तमेढ 

जळगाव : पूर्ण वाढ न झालेल्या नवजात शिशूंमध्ये बऱ्याचदा कमजोर डोळ्यांची समस्या जाणवते. काहींमध्ये ती जन्मतः:च असते, तर काहींमध्ये जन्मानंतर ठराविक महिने, वर्षांनी ती दिसून येते. अशा शिशूंसाठी "रेटीनोथेरपी' अभियानाची मुहूर्तमेढ कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून रोवण्यात आली आहे, अशी माहिती कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन यांनी दिली. 

"कॉफी विथ सकाळ' या उपक्रमांतर्गत डॉ. जैन यांनी "सकाळ'च्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली, या भेटीत त्यांनी नेत्रालयाच्या वाटचालीबाबत संवाद साधला. प्रारंभी निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जैन इरिगेशनच्या जनसंपर्क विभागाचे संचालक अनिल जोशी, सहाय्यक किशोर कुळकर्णी उपस्थित होते. 

डॉ. भावना जैन याबाबत म्हणाल्या की, अलीकडच्या काळात मुलांमध्ये डोळ्यांचे अनेक विकार बघायला मिळतात. गर्भाची पूर्ण वाढ न झालेल्या (pre-matuared) नवजात शिशूंमध्ये डोळ्यातील नस, पडदे कमजोर असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशा बालकांना लहानपणापासूनच कमजोर नेत्रपटलामुळे (retina) कमी दिसते. जन्मतः: ही समस्या लक्षात आली नाही आणि पुढेही दुर्लक्ष झाले, तर त्या मुलाची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे अशा शिशूंचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे नेत्रपटल तपासण्याची आणि त्यात काही दोष आढळल्यास त्यावर उपचार करण्याची मोहीम कांताई नेत्रालयातर्फे हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शिशूंच्या हॉस्पिटलशी संपर्क करून अशा शिशूंची नोंद घेऊन त्यांच्या नेत्रपटलाची तपासणी नियमितपणे करण्यात येईल. ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांच्यावर कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून उपचार केले जातील, असे त्या म्हणाल्या. 

आळशी डोळ्याला सक्रिय करायचेय 
लहान मुलांमध्ये दृष्टी कमी होण्याचे प्रमाण वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत, त्याबाबत डॉ. जैन म्हणाल्या, बालपणी नजर कमी असण्याची किंवा हा दोष निर्माण होण्यामागे आनुवंशिकता, जीवनसत्त्वांची कमी, बदललेली जीवनशैली, डोळ्यांवरील ताण, डोळ्यांचा दाब अशी कारणे असू शकतात. वेळीच तपासणी करून योग्य नंबर घेतला नाही, आणि तसा चष्मा वापरला नाही तर डोळा आळशी होतो. त्यातून दृष्टी जाण्याचाही धोका भविष्यात संभवतो. त्यामुळे अशा आळशी डोळ्यांना सक्रिय करण्यासाठी कांताई नेत्रालयाच्या पुढाकाराने आम्ही जनजागृती करतोय, असे त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com