जिल्ह्यातील अकरा ग्रा. पं. सदस्य अपात्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीतील सुमारे अकरा सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.

जळगाव ः जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीतील सुमारे अकरा सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. एकाचवेळी अकरा सदस्यांवर झालेल्या अपात्रेच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. 

जिल्हा विधी अधिकारी ऍड. हारूल देवरे यांनी सांगितले, की रामनगर (ता. चाळीसगाव) येथील ग्रामपंचायत सदस्या कविता मणिलाल बेलदार यांनी राखीव मतदार संघातून निवडणूक लढविली होती. मात्र, जातीचे प्रमाणपत्र सादर केले नव्हते. याप्रकरणी योगेश खैरनार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 15 सप्टेंबर 2019 ला तक्रार दाखल केली होती. त्यावर आज निर्णय होऊन कविता बेलदार यांना अपात्र करण्यात आले आहे. 

आर्वजून पहा : जळगाव तहसीलचे रेकॉर्ड आगीच्या भक्ष्यस्थानी
 

वरखेडी (ता.पाचोरा) येथील ग्रामपंचायत सदस्य जगदीश पंढरीनाथ चौधरी, सीमा धनराज पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविली. त्यांनी जातप्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार पितांबर त्र्यंबक पाटील यांनी 22 जानेवारी 2019 ला दिली. त्यावर आज निर्णय होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौधरी व पाटील यांना अपात्र केले. 
नांदवेल (ता.मुक्ताईनगर) येथील मनीषा संदीप पाटील, मुरलीधर त्र्यंबक पाटील यांनी 2017 मध्ये मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांनीही जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार दीपक वाघ, नागसेन सूरळकर यांनी 18 जुलै 2019 ला केली होती. त्यावर आज निर्णय होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मनीषा पाटील, मुरलीधर पाटील यांना अपात्र केले.  अडावद (ता. चोपडा) येथील मंगला मुरलीधर सोनवणे, चंद्रभागा महादू बाविस्कर, आसाराम कोळी, आशाबाई सुरेश कोळी/माळी, फकिरा मांगो तडवी यांनी 2018 मध्ये राखीव संवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांनी जातप्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार वासुदेव महाजन यांनी 3 ऑगस्ट 2019 ला केली. आज त्यावर निकाल होऊन पाचही सदस्यांना अपात्र केले. पाडळसे (ता.यावल) येथील किशोर शांताराम कोळी यांनी 2017 मध्ये निवडणूक लढविली होती. त्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार विष्णू भिल यांनी 4 सप्टेंबर 2018 ला केली होती. आज त्यावर निकाल होऊन कोळी यांना अपात्र करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Eleven grams in the district. Pt. Member ineligible