किटी पार्टीतील "देशी मेम'साठी पतीराजांची धावपळ ; नाव वगळण्यासाठी वशीले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

लॉकडाउन' काळात जमावबंदी आदेश लागू असून, कुठलेही कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. असे असताना श्रीश्री लेकप्राइड अपार्टमेंटमध्ये "किटी पार्टी' आयोजक महिलांवर कारवाईअंतर्गत आज लेखी समज देण्यात आली. तत्पूर्वीच, पत्नीचे नाव आल्याने पतिराजांनी दाखल तक्रारीतून नाव कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना साकडे घातले.

जळगाव, : शहरातील शिरसोली रस्त्यावर श्रीश्री लेकप्राइड या उच्चभ्रू रहिवासी अपार्टमेंटमध्ये बुधवारी (ता. 20) "किटी पार्टी'चे आयोजन करण्यात आले होते. अपार्टमेंटमधील 34 महिलांचा गट पार्किंगमधील सभागृहात "पार्टी'साठी एकत्र आल्याने एमआयडीसी पोलिस पथकाने छापा टाकून कारवाई केली. 

जळगाव- शिरसोली रस्त्यावर मेहरुण तलावासमोरच श्रीश्री लेकप्राइड अपार्टमेंट आहे. शहरातील उच्चभ्रू नोकरदार आणि व्यावसायिकांचा येथे रहिवास असून, अपार्टमेंटमधील पूनम कमलेश कटारिया आणि उषा महेंद्र प्रताप- जोशी या गटप्रमुखांतर्फे दर महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करून "किटी पार्टी'चे आयोजन होते. यंदा 20 मे तारीख निश्‍चित झाल्याने रात्री साडेआठपासूनच "पार्टी'ला सुरवात झाल्याने महिलांची गर्दी झाली होती. जेवणावळी आणि "पार्टी'तील गप्पांमध्ये महिला रंगलेल्या असताना पोलिस पथकाने छापा टाकला. पोलिस आल्याचे पाहताच "पार्टी'त सहभागी महिलांनी धूम ठोकली. आयोजक महिलांकडे उपलब्ध यादीनुसार, पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

अशी झाली कारवाई 
श्रीश्री लेकप्राइड अपार्टमेंटमध्ये "किटी पार्टी' सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यांनी तत्काळ निरीक्षक विनायक लोकरे यांना सूचना केल्यावरून पोलिस पथकाने महिला पोलिसांसह घटनास्थळ गाठून कारवाई केली. सहाय्यक फौजदार मंजुळा तिवारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येऊन "पार्टी'मधून पोलिस पथकाने प्रत्येकी दोन हजार रुपये संकलित केल्याच्या हिशेबाचे रजिस्टर आयोजक महिलांकडून जप्त केले आहे. 

पतिराजांची धावपळ 
"लॉकडाउन' काळात जमावबंदी आदेश लागू असून, कुठलेही कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. असे असताना श्रीश्री लेकप्राइड अपार्टमेंटमध्ये "किटी पार्टी' आयोजक महिलांवर कारवाईअंतर्गत आज लेखी समज देण्यात आली. तत्पूर्वीच, पत्नीचे नाव आल्याने पतिराजांनी दाखल तक्रारीतून नाव कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना साकडे घातले. काहींनी "सीसीटीव्ही' तपासून ज्या महिला गैरहजर असतील, त्यांची नावे कमी करण्यासाठी तगादा लावला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news ; highprofil kiti parti