esakal | `सर्कस' चा "लाइव्ह शो' अखेरच्या टप्प्यात! 

बोलून बातमी शोधा

`सर्कस' चा "लाइव्ह शो' अखेरच्या टप्प्यात! 

गेल्या अनेक वर्षांपासून तंबू लावून कसरतीचा "लाइव्ह शो' करणाऱ्या "सर्कस'ला आता घरघर लागली आहे. शहरात आलेल्या "ग्रेट भारत सर्कस'ला प्रेक्षकांची संख्या कमी झाली असली, तरी या कलाकारांचा उत्साह मात्र कुठेच कमी नाही.

`सर्कस' चा "लाइव्ह शो' अखेरच्या टप्प्यात! 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव  : दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सद्यःस्थितीत "लाइव्ह शो'च्या कार्यक्रमांचे पेव आले आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तंबू लावून कसरतीचा "लाइव्ह शो' करणाऱ्या "सर्कस'ला आता घरघर लागली आहे. शहरात आलेल्या "ग्रेट भारत सर्कस'ला प्रेक्षकांची संख्या कमी झाली असली, तरी या कलाकारांचा उत्साह मात्र कुठेच कमी नाही. कसरतीची कला तेवढ्यात ताकदीने सादर करून उपस्थित प्रेक्षकांकडून ते टाळ्यांची दाद मिळवीत उत्साह वाढवीत असतात. 

आर्वजून पहा :अनेक बळी घेऊनही चौपदरीकरणाचे काम ठप्पच! 

दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या या युगात "सर्कस'मधील कलाकारांना पूर्वीच्या वैभवाची अपेक्षा नाही; परंतु प्रेक्षकांनी जर प्रतिसाद दिला नाही, तर येत्या पाच वर्षांत "सर्कस'ही लोप पावणार असल्याची खंत त्यांच्या मनात आहे. "सर्कस' म्हटली म्हणजे, एकेकाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण असायचे. त्यावेळी पुस्तकात चित्र पाहिलेले वाघ, सिंह, हत्ती, उंट, जिराफ, अस्वल हे प्रत्यक्षात पाहावयास मिळायचे. नव्हे; तर ते माणसाच्या इशाऱ्यावर कसरती करीत असल्याचेही पाहावयास मिळायचे. त्यानंतर त्यातील पुरुष व महिलांच्या कसरती आणि "जोकर'ची गमतीदार धमाल- मस्ती प्रेक्षकांना खिळवून ठेवायची. मात्र, आता शासनाच्या नियमाप्रमाणे "सर्कस'मध्ये प्राण्यांवर बंदी आली आणि या ठिकाणी "सर्कस'चे अर्धे महत्त्व कमी झाले; परंतु तरीही कलाकारांनी हार मानली नाही. अगदी त्यांनी आपल्या कसरतीच्या भरवशावर प्रेक्षकांना खिळवून ठेवत "सर्कस' सुरूच ठेवली आहे. अगदी "जोकर'ही करामती दाखवीत प्रेक्षकांना हसवीत असतात. मात्र, आज त्यांना त्यांच्या कलेला दाद देणारा प्रेक्षकच कमी झाला आहे. 

हेपण पहा :  जिल्ह्यात एक हजार पन्नास कोटींची कर्जमुक्ती

शहरात एस. टी. वर्कशॉपच्या मैदानावर आलेल्या "ग्रेट भारत सर्कस'ची कथा यापेक्षा वेगळी नाही. गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच "सर्कस' शहरात आली आहे. या "ग्रेट भारत सर्कस'चे खेळ नावीन्य व आकर्षक आहेत. जळगावकर प्रेक्षकांची दाद चांगली आहे. पण, ती अधिक हवी असल्याची त्यांची अपेक्षा आहे. "सर्कस'चे व्यवस्थापक राजन पिलई म्हणतात, ""आजच्या स्थितीत "सर्कस' चालविणे म्हणजे खऱ्या अर्थाने "सर्कस' आहे. दिवसेंदिवस खर्च वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे देशभरातील "सर्कस' बंद पडल्या आहेत. सद्यःस्थितीत देशात केवळ सात ते आठ "सर्कस' आहेत; परंतु प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यास येत्या पाच वर्षांत या "सर्कस' पूर्णपणे बंद पडतील. यापुढे केवळ चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या पडद्यावरच त्या पाहावयास मिळतील. आमच्या "सर्कस'मध्ये कलाकार व कामगार मिळून 90 जण आहेत. ऑर्केस्ट्रा, तंबू व इतर एक दिवसाचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे; परंतु तेवढे उत्पन्न मिळत नाही. आम्ही कलाकारांच्या जीवनाचा प्रश्‍न असल्यामुळे "सर्कस' बंद करू शकत नाही. ती सुरूच ठेवत आहोत. यातील कलाकार एकाहून एक सरस आहेत. प्रेक्षकांची संख्या कमी असली, तरी ते कधी निराश होत नाहीत. आपली कला तेवढ्याच ताकदीने सादर करीत असतात. प्रेक्षकही दाद देत असतात. प्रेक्षकांचे कमी होण्याचे कारण म्हणजे जनावरे हेच आहे. "सर्कस'मध्ये जनावरांना बंदी झाल्यामुळे प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे. मात्र, आम्हाला शासनाचे चांगले सहकार्य आजही मिळते. "एनजीओं'चा आम्हाला त्रास आजही असतो. ते वारंवार येऊन आम्हाला त्रास देत असतात. महाराष्ट्रात मात्र आम्हाला फारसा त्रास होत नाही. मात्र, या सर्वांवर आम्ही मात करू. पण, ही कला जोपासण्यासाठी आम्हाला हवी आहे प्रेक्षकांची साथ, ती जळगावकर देत आहेत; परंतु अधिक द्यावी, हीच अपेक्षा.