कार्यालयीन कामाचा तणाव...अन्‌ जायकवाडी धरणात आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

कार्यालयीन कामकाजामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. यातूनच आत्महत्या केल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. मात्र, सोनार बेपत्ता झाल्यावर जायकवाडी धरणावरच का केले, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. 

जळगाव: धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी हेमंत प्रभू सोनार (वय 40, रा. आशाबाबानगर रोड, जळगाव) हे बेपत्ता झाल्याची घटना प्रजासत्ताकदिनी सायंकाळी उशिरा समोर आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. बेपत्ता हेमंत सोनार यांचा मृतदेह सोमवारवी सकाळी पैठण येथील जायकवाडी धरणात आढळून आला. कार्यालयीन कामकाजामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. यातूनच आत्महत्या केल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. मात्र, सोनार बेपत्ता झाल्यावर जायकवाडी धरणावरच का केले, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. 

आशाबाबानगर परिसरात हेमंत सोनार पत्नी स्वाती, मुले भावेश व अक्षता अशा कुटुंबासह वास्तव्यास आहे. ते मूळ नकाणे रोड, धुळे येथील रहिवासी असून, सहा महिन्यांपूर्वीच ते पदोन्नतीवर जळगाव येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात रुजू झाले व आशाबाबानगर रोडवरील पारिजात अपार्टमेंट (ब्लॉक नं 57) येथे राहत होते. प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) सायंकाळी साडेचारला हेमंत सोनार हे पत्नीला मी बाहेरून फिरून येतो, असे सांगून निघाले. यानंतर रात्री उशिरा परत आले नाही. त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते मिळून न आल्याने नातेवाइकांना याबाबत माहिती कळविली. नातेवाइकांसह पत्नी स्वाती यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. रात्री 10.37 वाजेच्या सुमारास पती हेमंत सोनार हे बेपत्ता असल्याची माहिती दिली. 

 

नक्की पहा ः  मुलाच्या मृतदेहाजवळ सहा तास ती आक्रोश बसली अन्‌ पोलिस राहिले हद्दीच्या वादात
 

पैठण पोलिसांशी संपर्क 
सोनार राहत असलेल्या परिसरातील काही तरुण सोमवारीही त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते मिळून आले नाही. अचानक दुपारी दोनच्या सुमारास पैठण येथील पोलिसांचा फोन सोनार यांच्या पत्नीच्या मोबाईलवर आला. पोलिसांनी वर्णन सांगत, वर्णनाची व्यक्ती याठिकाणी असून, त्यांचे फोटो व्हॉट्‌सऍपवर पाठवीत आहे. ओळख पटवून ते तुमचे बेपत्ता असलेले पती आहेत काय? याबाबत सांगितले. त्यानुसार काही वेळात व्हॉट्‌सऍपवर आलेल्या फोटोनुसार जायकवाडी धरणावर आढळून आलेला मृतदेह हेमंत सोनार यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पत्नीसह मुलांनी हंबरडा फोडत एकच आक्रोश केला. माहितीनुसार नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी पैठणकडे रवाना झाले. 

 

हेपण पहा ः पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशायाचे भूत अन्‌ झाले असे 
 

कार्यालयीन जाचामुळे टोकाचा निर्णय 
हेमंत सोनार यांना कार्यालयातील सहकाऱ्यांकडूनच त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. रामानंदनगर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. तसेच, सोनार यांनी सुसाईड नोट लिहून ठेवल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. कार्यालयीन त्रासाबाबत तपासात उर्वरित विषयाचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news stress office work jayakwadi dam Suicide