खडसेंच्या धमकीने मोडला युतीचा डाव!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

जळगाव - जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचे नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने युतीचा निर्णय घेतला होता. नंतर एकमेकांकडून प्रतिसाद नसल्याने युती तुटल्याचे सांगितले जात असले, तरी यामागे भाजप नेते एकनाथ खडसे यांची भाजपला दिलेली धमकी कारणीभूत असल्याचे समजते. युती झाल्यास आपण युतीच्या विरोधात प्रचारात उतरू, असे स्पष्ट संकेत खडसे यांनी दिल्यानेच युतीचा बोजवारा उडाल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्री महाजन आणि जैन यांचे सख्य उघड आहे. जैन अडचणीत असताना महाजन यांनीच त्यांना मदत केल्याचेही सांगितले जाते.

त्यामुळे आजच्या परिस्थितीत महाजन सांगतील तो शब्द जैनांना "प्रमाण' असल्याची स्थिती आहे. केवळ महाजनांनी प्रस्ताव न दिल्याने युती झाली नाही, असा दावा आता जैन करीत आहेत. मात्र, खडसे यांच्या "दणक्‍या'च्या धाकाने भाजपने युतीचे एक पाऊल मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे.

चर्चेला सुरवातच नाही
पदाधिकारी; तसेच पक्ष कार्यकर्त्यांचा विरोध न जुमानता मंत्री महाजन युती करतील, असे वाटत असल्याने पक्ष कार्यकर्तेही हतबल होते. मात्र, युतीबाबत दोन्ही गटांची बैठक कधीच झाली नाही अथवा जागावाटपाची चर्चाही झाली नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांतर्फे 75 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले; तसेच सुरेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री महाजन यांच्याकडून युतीचा प्रस्ताव न आल्यामुळे युती झाली नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: jalgaon municipal election eknath khadse yuti politics