तुटलेली खेळणी, मोडके बाक; ‘मनपा’ची उद्याने झाली भकास!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

जळगाव - आबालवृद्धांना निवांतक्षणी आनंद घेण्याचे, रणरणत्या उन्हात सावलीचा आल्हाद देणारे आणि पहाटे मोकळी व शुद्ध हवा मिळण्याचे ठिकाण म्हणजे उद्याने. पण, शहरातील लोकसहभागातून तयार झालेली दोन उद्याने सोडल्यास एकही उद्यान सद्यःस्थितीत सुस्थितीत नाही.

जळगाव - आबालवृद्धांना निवांतक्षणी आनंद घेण्याचे, रणरणत्या उन्हात सावलीचा आल्हाद देणारे आणि पहाटे मोकळी व शुद्ध हवा मिळण्याचे ठिकाण म्हणजे उद्याने. पण, शहरातील लोकसहभागातून तयार झालेली दोन उद्याने सोडल्यास एकही उद्यान सद्यःस्थितीत सुस्थितीत नाही.

सिमेंटची जंगले वाढताना प्रदूषणामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. अशा वेळी हिरवळीने दिलासा देणाऱ्या उद्यानांची संख्या वाढणे किंवा आहे ती उद्याने सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेचे बहुतांश उद्यानांकडे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे उद्यानांचीही वाट लागली असून, शहरातील मुलांनी खेळावे तरी कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

काही उद्यानांचा अस्तित्वासाठी संघर्ष 
महापालिकेच्या १२ ते १३ पैकी केवळ दोन उद्यानांची स्थिती चांगली आहे. ओसाड उद्यानात कायम दुर्गंधी असते. तेथील बाक तुटलेले, तुटलेल्या खेळणी, बसण्यासाठी जागा नसणे, साचलेला कचरा अशा भकास अवस्थेत उद्याने आहेत. त्या अनुषंगाने उद्यानात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक रोडावत आहे.   

लोकसहभागातून उद्यानांचा दिलासा
शहरात जैन कंपनीतर्फे काव्यरत्नावली चौकात अतिशय कमी कालावधीत चांगले उद्यान तयार करण्यात आले. तसेच शहराच्या मध्यवर्तीच्या ठिकाणांवरील भकास अवस्थेत असलेल्या महात्मा गांधी उद्यानाचा विकास करून जैन कंपनीने जळगावकरांना दोन चांगली उद्यान देण्याचे काम झाले.  
टारगट मुलांचा ‘ठिय्या’ 
शहरातील काही उद्यानात दिवसा व रात्री उशिरापर्यंत टारगट तरुणांचा उपद्रव असतो. सायंकाळी उद्यानाच्या जागेत प्रात:र्विधीस बसण्यावरून समोर राहणाऱ्या रहिवाशांचे वाद होत असतात. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणे वाजविणे, गोंधळ करणे, रस्त्यावर वाहने लावून धिंगाणा घालणे, असे प्रकार रोजच सुरू असतात. 

शिवाजी उद्यानाचे वैभव लयास 
मेहरूण तलावाकाठचे उद्यान म्हणून कधीकाळी वैभव असलेले शिवाजी उद्यान सध्या भग्नावस्थेत आहे. येथील तरण तलावासह सर्व खेळण्यांचे साहित्य नष्ट झाले आहे. अवैध वृक्षतोडीने हिरवळही लयास गेली असून, उद्यान भकास झाले आहे. तत्कालीन प्रसिद्ध अभिनेते व कपूर घराण्यातील ज्येष्ठ पृथ्वीराज कपूर यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्‌घाटन झाले. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे काही काळातच या उद्यानाचे वैभव लयास गेले. 

१६ हरित जागांचा होणार विकास
अमृत योजनेंतर्गत सोळा हरित जागांवर उद्याने तयार केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील वाढीव भागात देखील लहान उद्याने तयार होऊन त्या ठिकाणच्या नागरिकांना सुविधा मिळणार आहे. परंतु महापालिकेने या नवीन होणाऱ्या उद्यानाची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील उद्यानांची वाईट अवस्था आहे. या उद्यानांचा विकास करण्यासाठी शासनाची हरितपट्टा विकास योजना, तसेच काही संस्थांच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न आमचा राहीन.
- भगत बालाणी, गटनेते, भाजप

शहरात दोनच उद्याने सुस्थितीत आहेत. मात्र, ही उद्याने शहरातील अनेकांना दूर पडतात. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली भकास उद्याने चांगली करावीत. जेणेकरून लहान मुले व आबालवृद्धांना त्याचा लाभ घेता येईल.
- जयश्री पाटील, नागरिक

शहिदांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष 
१९३९ ते १९४५ या कालखंडातील जागतिक दुसऱ्या महायुद्धात जिल्ह्यातील एक हजार ६०१ लोक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ श्‍यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात स्मारक उभारलेले आहे. त्याची देखभाल व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे या स्मारकाची बिकट अवस्था आहे. शहिदांचा जणू हा अपमानाच असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. तसेच या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी एकता रिटेल पतसंस्थेने तयारी दर्शविली होती. तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांनीही सहमती दर्शवली होती; परंतु त्यानंतर मात्र हे उद्यान सुशोभीकरणाबाबत हालचाली झाल्या नाहीत.

या आहेत उद्यानातील समस्या 
 तुटलेली खेळणी 
 तुटलेले बाक 
 जागोजागी अस्वच्छता 
 तुटलेल्या कचराकुंड्या 
 पक्ष्यांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी 
 महिला व पुरुषांसाठी एकच स्वच्छतागृह 
 पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही 
 सुरक्षारक्षक नाही 
 उद्यानात दिवे नसल्याने अंधार 
 दिवसा व रात्री टवाळखोर व गर्दुल्यांचा त्रास 

ही आहेत महापालिकेची उद्याने
बहिणाबाई चौधरी उद्यान, शिवाजी उद्यान, श्‍यामाप्रसाद मुखर्जी, मीर शुक्रुल्लाह उद्यान, गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, साने गुरुजी उद्यान, वाल्मीकी उद्यान, अहिल्याबाई होळकर बालोद्यान.

Web Title: Jalgaon Municipal Garden Problem