दसऱ्याच्या मुहूर्तावर धावणार हजार नवीन गाड्या!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

जळगाव - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा अर्थात विजयादशमीच्या सणाला नवीन वस्तू खरेदीची परंपरा कायम आहे. या परंपरेनुसार आजपासूनच वाहन आणि इलेक्‍ट्रॉनिक मार्केटमध्ये खरेदीला सुरवात झाली आहे; परंतु मुहूर्ताच्या दिवशीच वाहन घरी आणण्याच्या दृष्टीने ग्राहकांनीदेखील नोंदणी केली आहे. यामुळेच उद्या वाहन मार्केटमधून हजार नवीन गाड्या रस्त्यावर धावणार असून, यात दुचाकी मार्केट सुसाट आहे.

जळगाव - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा अर्थात विजयादशमीच्या सणाला नवीन वस्तू खरेदीची परंपरा कायम आहे. या परंपरेनुसार आजपासूनच वाहन आणि इलेक्‍ट्रॉनिक मार्केटमध्ये खरेदीला सुरवात झाली आहे; परंतु मुहूर्ताच्या दिवशीच वाहन घरी आणण्याच्या दृष्टीने ग्राहकांनीदेखील नोंदणी केली आहे. यामुळेच उद्या वाहन मार्केटमधून हजार नवीन गाड्या रस्त्यावर धावणार असून, यात दुचाकी मार्केट सुसाट आहे.

मुहूर्त कोणताही असो; खरेदी ही आलीच. त्यातच दसरा- दिवाळीचा सण आला, की ऑटोमोबाइल्स आणि इलेक्‍ट्रॉनिक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. त्यानुसारच दसऱ्याच्या मुहूर्तासाठी हिरो होंडा, टीव्हीएस, यामाहा, बजाज यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या शोरूममध्ये अनेकांची नोंदणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांमध्ये ह्युंडाई, मारुती, होंडा या कंपनीच्या गाड्यांचे मार्केटमध्ये देखील मोठी उलाढाल आहे. दुचाकीमध्ये बुकिंग झालेल्या गाड्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही हिरो, होंडा व टीव्हीएस कंपन्यांच्या गाड्यांना आहे. याखालोखाल ‘बजाज’च्या गाड्यांना मागणी आहे.

सहाशेहून अधिक दुचाकींची बुकिंग
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी ऑटोमोबाईल्स्‌ मार्केटमध्ये आज प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. शहरातील सर्वच शोरूममध्ये वाहन खरेदी आणि बुकिंगसाठी सकाळपासूनच गर्दी होती. अनेकांनी आजच गाडी घरी घेऊन जाणे पसंत केले असून, उद्या (३० सप्टेंबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी नेणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. यामुळे या मुहूर्तासाठी शहरातील शोरूममधून नऊशेच्या जवळपास गाड्यांची बुकिंग झाली असून, यामध्ये साडेसहाशे दुचाकी गाड्या आहेत. यामध्ये ‘टीव्हीएस’च्या १५०, ‘होंडा’च्या दीडशेहून अधिक गाड्या, ‘यामाहा’च्या ५० यासह हिरो व बजाजच्या मिळून दोनशे ते अडीचशे गाड्यांचे बुकिंग आहे.  

वाहनांसाठी प्रतीक्षा! 
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी नेण्यासाठी अनेकांनी महिनाभरापासून गाड्यांची बुकिंग केली आहे. यामुळे साधारण सहाशेहून अधिक गाड्यांची नोंदणी झाली आहे. परंतु, सर्वच ग्राहकांना गाडी मिळेलच, असे नाही. कारण होंडा, हिरो, टीव्हीएस, यामाहा या कंपन्यांच्या काही विशिष्ट गाड्यांच्या मॉडेलला सर्वाधिक मागणी असून, गाड्यांसाठी ग्राहकांना नोंदणी केल्यानंतर अनेकांना साधारण वीस ते पंचवीस दिवस प्रतीक्षा करावी लागणार, अशी स्थिती आहे. सध्या दसरा आणि पंधरा दिवसांनी येणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तासाठी बुकिंग लक्षात घेता प्रतीक्षेतील ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक मार्केटमध्ये ऑफर्स 
मुहूर्तावर खरेदीचा मोह आवरला जात नाही. याचे चित्र इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व मोबाईल मार्केटमध्ये पाहण्यास मिळाले. इलेक्‍ट्रॉनिक्‍स मार्केटमध्ये लॅपटॉप, टीव्ही, एलसीडी टीव्ही यासह फ्रिज, वॉटर प्युरिफायर यासारख्या वस्तूंची खरेदी केली जात आहे. तसेच सध्या स्मार्टफोनचे मार्केट तेजीत असल्याने मोबाईल बाजारात देखील दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर अधिकच तेजीत आला आहे. नवीन ब्रॅन्डेड कंपनीचे मोबाईल घेताना त्यात असलेले सर्व फीचर्स तपासणी करून घेतले जात आहे.

८१ बुलेट धावणार...
जुन्या मॉडेलमधील आणि नवीन टेक्‍नॉलॉजीतील ‘सेल्फ स्टार्ट’ असलेल्या बुलेटलादेखील मागणी वाढली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने महिनाभरापासून बुलेटची बुकिंग सुरू असल्याने महिनाभरात साधारण अडीचशे गाड्यांची बुकिंग झाली आहे; परंतु, प्रत्यक्षात दसऱ्याच्या मुहूर्तावर ८१ बुलेट उपलब्ध होणार आहेत. उर्वरित गाड्या या काही दिवसांनंतर उपलब्ध होणार असल्याची माहिती उषा मोटर्सचे जनरल मॅनेजर श्‍याम कपूर यांनी सांगितले.

Web Title: jalgaon news 1000 new vehicle on dasara muhurt