शेतमालास हमीभावाशिवाय पर्याय नाहीच! - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

जळगाव - 'शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करायच्या असतील, तर हमीभावाशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याला अडचणींमधून बाहेर काढून समृद्ध करण्याची जबाबदारी सर्व समाजाची आहे,' असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले.

जळगाव - 'शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करायच्या असतील, तर हमीभावाशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याला अडचणींमधून बाहेर काढून समृद्ध करण्याची जबाबदारी सर्व समाजाची आहे,' असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले.

जैन इरिगेशनतर्फे आयोजित आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी व उच्च तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील अविनाश पाटोळे यांना हा पुरस्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री एकनाथ खडसे, सुरेशदादा जैन, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, अशोक जैन आदी उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, शेतकऱ्यांपुढील अडचणी कमी होताना दिसत नाही. एकामागून एक संकटे येत असताना शेतकरी उभा कसा राहील? शेतमालाचा भाव वाढला की महागाई वाढल्याची ओरड होते. उत्पादक पिकवणारच नाही तर ते लोकांपर्यंत कसे पोचेल, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी शेतमालास हमीभावाशिवाय पर्याय नाही. शेतकरी हिताचा विचार आवश्‍यकच आहे. या वेळी फुंडकर, लोणीकर यांचीही भाषणे झाली.

केळीवरील रोगाबाबत दिला इशारा
काही दिवसांपूर्वी पंजाब, हरयाणात कृषिक्षेत्राशी संबंधित कामासाठी गेलो असता त्याठिकाणच्या गव्हावर "तांबेरा' रोग पडल्याचे आढळून आले. तेथील कृषितज्ज्ञ, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसाच रोग आगामी काळात आपल्या भागातील केळी पिकावरही येऊ शकतो, असे सांगत शरद पवारांनी यासंदर्भात जैन इरिगेशनच्या संशोधकांसह कृषी अधिकाऱ्यांना याबाबत वेळीच काळजी घेण्याचे सूचित केले.

Web Title: jalgaon news agriculture goods rate sharad pawar