देशसेवेच्या स्वप्नाने घेतली गगनभरारी

जळगाव - मू. जे. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारपासून हवाई दलाची भरती सुरू झाली. या भरतीसाठी जमलेले तरुण.
जळगाव - मू. जे. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारपासून हवाई दलाची भरती सुरू झाली. या भरतीसाठी जमलेले तरुण.

जळगाव - खानदेशात त्यातही जळगाव जिल्ह्यात प्रथमच हवाई दलाची भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीच्या मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाल्याने तरुणाईमध्ये आज कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.  भारतीय हवाई दलातील एअरमॅन ग्रुप वाय नॉनटेक्‍निकल ट्रेडस (ऑटोमोबाईल टेक्‍निशियन, जीटीआय व आयएएफ (पी) या पदाच्या भरतीला आजपासून येथील मू. जे. महाविद्यालयाच्या मैदानावर सुरवात झाली. मेळाव्यास राज्यभरातील विविध ठिकाणचे तीस हजारांवरील युवक सहभागी झाले आहेत. या माध्यमातून देशसेवेची संधी मिळणार असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांमध्ये होती. दरम्यान, इतर जिल्ह्यांमधूनही अनेक तरुण या भरतीसाठी जळगावात दाखल झाले आहेत.

भारतीय हवाई दलातील एअरमॅन ग्रुप वाय नॉन-टेक्‍निकल ट्रेड्‌स (ऑटोमोबाईल टेक्‍निशियन, जी. टी. आय व आयएएफ पी) या पदासाठी ही भरती सुरू झाली आहे. आज सकाळी सहाला उमेदवारांना मू. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय महामार्गाकडील प्रवेशद्वाराने प्रवेश देण्यात आला. यामुळे सकाळी आठपर्यंत महामार्गाकडून ‘मू. जे.’ कडे येणार रस्ता बंद करण्यात आला होता. सकाळी सर्व उमेदवारांना मैदानावर बसविण्यात आले. 

वयाची अट असेल तरच पात्र
या भरतीसाठी सर्वांत महत्त्वाची पात्रता वयाची अट होती. शैक्षणिक पात्रता दहावी + २ ही परीक्षा ५० टक्के गुणांसह पास असणे आवश्‍यक होते. उमेदवार हा १३ जानेवारी १९९८ ते २७ जून २००१ दरम्यान जन्मलेला असावा. या मुख्य अटी होत्या. आलेल्या सर्व उमेदवारांचे दहावी, बारावीचे प्रमाणपत्र, जन्मतारीख तपासली. या प्रक्रियेत बराच काळ गेला. या सर्व अटी पूर्ण असलेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले. अनेक युवक वयाच्या अटीत बसत नसल्याने त्यांना परतावे लागल्याचे चित्र होते. 

लेखी परीक्षा 
वयाची, शैक्षणिक अट पूर्ण केल्यानंतर सामान्य ज्ञान, ऑटोमोबाईल टेक्‍निशियन, जीटीआय व आयएएफ व सामान्य ज्ञानावर आधारित लेखी परीक्षा उमेदवारांची घेण्यात येत होती. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी सायंकाळपर्यंत लावून नंतर त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. दिवसभरात लेखी परीक्षा घेऊन नंतर निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया झाली.

भरतीसाठी अमरावती, अकोला, भंडारा, बुलडाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशीम आदी ठिकाणचे उमेदवार आले होते. आणखी दोन दिवस भरतीची प्रकिया सुरू राहणार आहे.

भरतीबाबत उत्सुकता
समाधान सुरवाडे - हवाई दलाच्या भरतीमुळे स्थानिक तरुणांना देशसेवेची संधी मिळाल्याने उत्सकता आहे. या भरतीसाठी जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील तरुण आले आहेत. त्यामुळे स्पर्धा मोठी आहे. उमेदवारांची वाढती संख्या पाहता व्यवस्था तोकडी पडली. पण तरीही खानदेशात पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होत असल्याने याबाबत उत्साह आहे.  

निवड झाली तर आनंदच
स्वप्नील जोशी - मोठ्या आशेने मी या भरतीसाठी आलो आहे. अशी भरती जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होत आहे. माझी लेखी परीक्षा झाली. आता पुढे निकाल काल लागतो, याकडे लक्ष लागून आहे. माझी निवड झाली तर यासारखा दुसरा आनंद नसेल. 

वयाची अट नको होती
पंकज शेटे - भरतीसाठी असंख्य युवक आले आहेत. मात्र वयाची अट घालण्यात आली तेही ठरावीक तारखेमध्येच यामुळे अनेक मुलांना भरती होता येणार नाही, ही खंत आहे. किमान संवर्गानुसार काहींना वयाच्या मर्यादेत सूट द्यायला हवी होती. बेरोजगारी वाढत आहे दुसरीकडे वयाची मर्यादा घालून युवकांना संधीपासून रोखले जात आहे. 

येथेही मेरिटनुसारच निवड
अमोल पाटील - या भरतीतून किती विद्यार्थी निवडले जातील हे सांगता येत नाही. मात्र अत्यल्प विद्यार्थ्यांना भरतीचा लाभ होईल, असे वाटते. पहिल्या फेरीत सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली. त्यातील २५ युवकांना चाचणीसाठी निवडले.

छायाचित्रकाराने दिला चहा
भरतीसाठी आलेल्या उमेदवार मू. जे. परिसरात असलेल्या व्यापारी संकुलांच्या मोकळ्या जागेत अनेक उमेदवार थंडीत कुडकुडत रात्री झोपले होते. त्यांना छायाचित्रकार दत्ता पाटील यांनी चहा, बिस्कीट दिले. शेकोटी करून अनेक  उमेदवार ऊब मिळविण्याचा प्रयत्न करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com