जळगावकरांचे स्वप्न साकारण्यास विमानतळ सज्ज!

जळगावकरांचे स्वप्न साकारण्यास विमानतळ सज्ज!

जळगाव - जीवनात एकदा तरी विमानात बसावे, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. जळगावकरांची हीच अपेक्षा पूर्णत्वास येण्याचा योग आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तिकिटेही बुक आहेत. प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष विमान येण्याची; परंतु त्याचीही तयारी जळगाव विमानतळ प्रशासनातर्फे सुरू आहे. सुरक्षा व्यवस्थेसह टॅक्‍सी पार्किंग, कॅन्टीन यांचे काम गतीने सुरू आहे. शिवाय, ‘एअर डेक्कन’ या विमान कंपनीचे अधिकारीही जळगावात दाखल झाले असून, त्यांनी तिकीट विन्डोसह इतर कामेही सुरू केली आहेत. 

जळगावहून विमानसेवा सुरू व्हावी, अशी येथील सर्वसामान्यांसह सर्वांचीच १९७२ पासून इच्छा आहे. मात्र, त्याला आकार येत नव्हता. तब्बल ४५ वर्षांनंतर ती पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘उडेगा आम आदमी’ या संकल्पनेतून देशातील काही शहरात कमी दरात प्रवाशांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. त्यात जळगाव शहराचाही समावेश आहे. शनिवारपासून (२३ डिसेंबर) पहिल्या टप्प्यात जळगाव ते मुंबई अशी विमानसेवा ‘एअरडेक्‍कन’ या खासगी विमान कंपनीतर्फे  सुरू होत आहे. 

सुरक्षापथकही दाखल
विमानतळ सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाकडे आहे. या विभागाकडे राज्यातील मेट्रो, मुंबई, औरंगाबाद, नागपूर विमानतळाची जबाबदारी आहे. आता त्यांच्याकडे नाशिक, कोल्हापूर आणि जळगावचीही जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिस विभागाच्या समकक्ष ही यंत्रणा असते. सुरक्षा अधिकारी मनोज डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४८ जणांचे पथक जळगावात सज्ज झाले आहे. विमानतळाची संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी या पथकाकडे असून ते उद्या (ता. २१) सुरक्षेसाठी विमानतळ ताब्यात घेणार आहेत.

‘एअर डेक्‍कन’ची तयारी  
विमानतळ प्रशासनाप्रमाणे ‘एअरडेक्कन’ विमान कंपनीचीही तयारी सुरू आहे. कंपनीचे स्टेशन अधीक्षक राहुल राजेश जळगावात दाखल झाले आहेत. तर आणखी दहा अधिकाऱ्यांची टीम उद्या (२१ डिसेंबर) जळगावात दाखल होत आहे. विमानतळावर तिकीट तपासणी, तसेच बुकिंग खिडकीचीही सुविधा करण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. राहुल राजेश यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की एअरडेक्कन विमानसेवा सज्ज आहे. जळगावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जळगावातून पुणे सेवा सुरू करण्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव आहे. त्यामुळे ही सेवाही लवकरच सुरू होईल, शिवाय जळगावात ४८ सीटर विमान आणण्याबाबतही कंपनीची तयारी सुरू आहे. 

प्रशासनही झाले सज्ज
विमानतळ प्रशासनाची वेगाने तयारी सुरू आहे. या ठिकाणी आता टॅक्‍सी पॉर्किंग, तसेच कॅन्टीनचे काम सुरू आहे, तर प्रवासी प्रतीक्षालयाचे काम केव्हाच पूर्ण झाले आहे. सामानाच्या तपासणीसह सर्व यंत्रे या ठिकाणी सज्ज आहेत. आता केवळ किरकोळ कामे करून त्यावर अंतिम हात फिरविण्यात येत आहे. 

जळगाव विमानतळावरून प्रवासी विमान उड्डाणासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. प्रशासनही संपूर्ण सुविधेसह सजग आहे. 
- विकास चंद्र, विमानतळ अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com